सावर्डे: दुर्गेवाडीत जमिनीचा वाद पेटला! मालकी हक्काच्या जागेत घुसखोरी करणाऱ्या दोघांवर कारवाई

saurabhsalvi26@gmail.com
2 Min Read

सावर्डे: चिपळूण तालुक्यातील दुर्गेवाडी येथे जमिनीच्या वादातून एका केअर टेकरला पक्के कुंपण घालण्यापासून रोखत, संबंधित जागेत अनधिकृतपणे संडासची टाकी बांधल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी मुंबईतील व्यावसायिक विजय के. मंथेना यांनी दिलेल्या तक्रारीवरून सावर्डे पोलिसांनी दोन जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी विजय मंथेना यांच्या पत्नी स्मिता मंथेना यांच्या नावे दुर्गेवाडी येथे गट क्रमांक ६६७/२ मध्ये ९ एकर २७ गुंठे जमीन आहे. या जमिनीची देखभाल करण्यासाठी रमेश सुदाम वरवाटकर (रा. हरेकरवाडी, संगमेश्वर) यांची केअर टेकर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या वर्षभरापासून या जमिनीच्या हद्दीवरून वाद सुरू असल्याचे समोर येत आहे. जमिनीचे संरक्षण करण्यासाठी केअर टेकर वरवाटकर हे जेव्हा त्या ठिकाणी पक्के कुंपण घालण्याचे काम करत होते, तेव्हा आरोपींनी त्यांना अटकाव केला.

या प्रकरणी आरोपी रवींद्र काशीराम लाड (५५) आणि संतोष शांताराम लाड (५०, दोन्ही रा. दुर्गेवाडी कोलतेवाडी) यांनी संगनमत करून मंथेना यांच्या मालकीच्या जागेत अनधिकृतपणे प्रवेश केला. केवळ कामात अडथळा न आणता आरोपी रवींद्र लाड याने सदर जमिनीमध्ये संडासची टाकी बांधून अतिक्रमण केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. हा प्रकार एप्रिल २०२५ पासून सुरू असून अखेर या त्रासाला कंटाळून मंथेना यांनी सावर्डे पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनी या तक्रारीची दखल घेत आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १२७(१), ३२९(३), ३२४(४) आणि ३(५) नुसार गुन्हा रजिस्टर क्रमांक ३४/२०२६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. सावर्डे पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *