GRAMIN SEARCH BANNER

मतदारांचा स्टॅम्प पेपरवरील करारनामा चर्चेत; उमेदवारांची झोप उडाली

Gramin Varta
525 Views

मुंबई: सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया वेग घेऊ लागली असताना भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यात एक अभूतपूर्व लोकचळवळ उभी राहिली असून तिची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात रंगली आहे.

मतदारांनी स्वतःहून पुढाकार घेत स्टॅम्प पेपरवरील ‘शपथपत्र करारनामा’ तयार करून नगरसेवक व नगराध्यक्ष पदाचे सर्व इच्छुक उमेदवारांनी त्यावर स्वाक्षरी करावी, अशी आग्रही मागणी केली आहे. या अद्वितीय प्रयोगाने प्रभागातीलच नव्हे तर नागपूर, पुणे आणि नाशिकपर्यंत राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

करारनाम्यात उमेदवाराने निवडून आल्यानंतर कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार, टेंडर-कमिशन व्यवहार अथवा गैरव्यवहार करणार नाही, निधी शंभर टक्के पारदर्शकतेने जनतेच्या हितासाठी वापरणार, अशी स्पष्ट अट नमूद आहे. एवढेच नव्हे तर एखादा गैरव्यवहार आढळल्यास उमेदवाराने स्वतःच पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवावी आणि कोणताही निर्णय मतदारांच्या उपस्थितीतच घ्यावा, अशी अटही बंधनकारक आहे.

या करारनाम्याची सर्वात कठोर तरतूद म्हणजे – वचनभंग किंवा भ्रष्टाचार आढळल्यास उमेदवाराने तात्काळ राजीनामा देऊन स्वतःवर गुन्हा दाखल करून घ्यावा. अन्यथा प्रभागातील मतदार शासनाला पोटनिवडणूक घ्यायला भाग पाडतील, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे. स्टॅम्प पेपरवरील करारनाम्याचे उल्लंघन केल्यास थेट फौजदारी कारवाई होऊ शकते, त्यामुळे अनेक उमेदवार या करारनाम्याला टाळण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे.

या उपक्रमाला सोशल मीडियावर प्रचंड प्रतिसाद मिळत असून महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणावर समर्थन देत आहेत. जागरूक मतदार उमेदवारांना थेट भेटून करारनामा देत आहेत आणि त्यावर स्वाक्षरीची मागणी करत आहेत. साकोली तालुक्यातील ही मोहीम केवळ एक करारनामा नसून लोकशाहीतील पारदर्शकतेचा नवा अध्याय मानली जात आहे. निवडणूक तापत असताना या उपक्रमाने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. मतदारांचा संदेश स्पष्ट आहे-

“विकास हवा… भ्रष्टाचार नको! आणि त्यासाठी लिखित हमी हवीच.”

Total Visitor Counter

3072972
Share This Article