राजापूर: मुंबई-गोवा महामार्गावरील उन्हाळे गंगातीर्थ तिठा येथे १ मे रोजी सकाळी सव्वासातच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात तीन प्रवासी जखमी झाले असून वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव इनोव्हा कारने दोन वाहनांना धडक दिल्याने हा अपघात घडला. याबाबत राजापूर पोलीस ठाण्यात चालक सतीश नामदेव खरात याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आाला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी जयेश बाळकृष्ण मांजलकर (वय ३३, रा. ठाणे) हे आपल्या ताब्यातील फ्रॉन्क्स गाडीने (क्र. MH 03 EF 5425) ठाणे येथून वैभववाडीकडे जात होते. मौजे उन्हाळे येथे आले असता, समोरून चुकीच्या बाजूने येणाऱ्या इनोव्हा क्रिस्टा कारने (क्र. MH 48 AX 2223) मांजलकर यांच्या गाडीला आणि त्यांच्या पाठीमागून येणाऱ्या टेम्पोला (क्र. MH 04 FP 5532) जोराची धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, यामध्ये मतीराम चौधरी, प्राची निवेकर आणि उज्वला निवेकर हे तिघे जखमी झाले असून दोन्ही वाहनांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
चालक सतीश खरात याने अतिवेगाने, हयगयीने आणि निष्काळजीपणे वाहन चालवून हा अपघात घडवून आणल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या घटनेची नोंद राजापूर पोलिसांनी भारतीय दंड संहिता आणि मोटार वाहन कायद्याच्या विविध कलमान्वये केली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. महामार्गावर विरुद्ध दिशेने वाहन चालवण्याच्या वाढत्या प्रकारांमुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.





