रत्नागिरी : गावखडीतील मच्छीमाराचा मृतदेह सापडला

saurabhsalvi26@gmail.com
1 Min Read

रत्नागिरी : तालुक्यातील गावखडी परिसरात रविवारी पाण्यात बुडून बेपत्ता झालेल्या मच्छीमाराचा मृतदेह सोमवारी सकाळी सापडला. असलम युनूस पेजे (५६) असे त्यांचे नाव आहे. मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात नेऊन उत्तरीय तपासणी केल्यानंतर कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला.

रविवारी दुपारी असलम पेजे यांनी गावडे आंबेरे येथील एका अन्य मच्छीमाराशी संपर्क साधून मच्छी उपलब्ध आहे का, याबद्दल विचारणा केली होती. मच्छी असल्याचे कळताच ते स्वतःची बोट घेऊन त्या दिशेने निघाले. मार्गात खाडीच्या पाण्यात अचानक बोटीचा वलवा पाण्यात पडल्याने बोट नियंत्रित करणे कठीण झाले. वलवा काढण्यासाठी त्यांनी पाण्यात उडी घेतली, मात्र त्याचवेळी बोट बाजूला सरकल्याने त्यांना परत बोटीवर चढता आले नाही. त्यानंतर ते पाण्यात खोल गेले आणि वर न दिसल्याने ते बेपत्ता झाले.

संध्याकाळपर्यंत असलम पेजे परत न पोहोचल्याने गावडे आंबेरे येथील मच्छीमारांनी शोध सुरू केला. त्यांना केवळ रिकामी बोट दिसून आली. माहिती मिळाल्यावर स्थानिक मच्छीमारांनी रात्रीभर शोधमोहीम राबवली. अखेर सोमवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास बिरजेवाडीजवळ त्यांचा मृतदेह आढळला. त्वरित किनाऱ्यावर आणून रत्नागिरी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला.

सायंकाळी पाच वाजता गावखडी येथे त्यांचा अंत्यविधी पार पडला. त्यांच्या पश्चात पत्नी आणि एक मुलगा असा परिवार आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *