GRAMIN SEARCH BANNER

राजापूर तालुक्यात बिबट्याच्या मृतदेहाबाबत उलटसुलट चर्चा

Gramin Varta
375 Views

स्थानिक व्हॉट्सअॅप ग्रुपवर फिरणारी पोस्ट; वनविभागाच्या ‘मौन भूमिके’वर ग्रामस्थांचा संशय

राजन लाड / जैतापूर

तालुक्यातील पश्चिमेकडील एका गावात बिबट्याचा मृतदेह सापडल्याची धक्कादायक माहिती असलेली पोस्ट त्या  गावातील अनेक व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये मोठ्या प्रमाणावर फिरत आहे. मृतदेहाचे विद्रूप स्वरूप, नदीपात्रात वाहत असल्याचे वर्णन आणि शरीराचे अवयव कापून नेल्याच्या चर्चेमुळे नागरिकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.

पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असताना स्थानिक वनविभागाकडे याबाबत माहिती असूनही त्यांनी अत्यंत गुप्तता पाळल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे. काही जणांचा तर असा संशय आहे की, “या प्रकरणात विलंब का केला जातोय? माहिती बाहेर येऊ नये म्हणून जाणूनबुजून वेळ खेचली जात आहे का?” असा प्रश्न परिसरात सुरू असलेल्या चर्चेतून समोर येत आहे.

या घटनेतील सर्वात गंभीर बाब म्हणजे प्रशासनाकडून याबाबत एकही अधिकृत माहिती अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. कोणतीही स्पष्ट नोंद, तात्काळ प्रतिसाद किंवा घटनास्थळी तपास असल्याची घोषणा न झाल्याने उलटसुलट चर्चा अधिकच वाढत आहेत. काही नागरिकांना हे संपूर्ण प्रकरण शंकेखोर वाटत असून, “जर घटना खरी असेल तर वनविभाग गप्प का?” असा सरळ सवाल उपस्थित केला जात आहे.

ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, वाघासारख्या संरक्षित प्राण्याच्या मृत्यूबाबत पोस्ट फिरत असताना वनअधिकारी शांत बसणे म्हणजे अत्यंत गंभीर दुर्लक्ष आहे. वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार अशा घटनेचे तातडीने पंचनामे, तपास व नमुने संकलन अपेक्षित असते.

“प्रत्यक्षात अशी क्रूर घटना घडली असल्यास आणि ती स्थानिक वनाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आली असल्यास, आतापर्यंत त्यांनी मौन का ठेवले? नागरिकांना माहिती का देत नाहीत? घटनास्थळी जाऊन तपास केला गेला की नाही?”  असा सवाल ग्रामस्थांनी उचलला आहे.

दरम्यान, अधिकृत माहिती नसल्याने नागरिक मोठ्या प्रमाणावर संभ्रमित आहेत. सोशल मीडियावरून येणाऱ्या पोस्टमुळे भीती आणि तणाव वाढत असून वनविभागाने तात्काळ भूमिका स्पष्ट करावी, खरं-खोटं सांगून पारदर्शक तपास जाहीर करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

प्रशासनाची शांतता आणि पोस्टची वाढती उलटसुलट माहिती यामुळे संपूर्ण तालुक्यात या प्रकरणाभोवती संशयाचं वातावरण निर्माण झालं आहे.

Total Visitor Counter

3366959
Share This Article