GRAMIN SEARCH BANNER

सरस प्रदर्शनातून बचतगट महिलांना प्रोत्साहनाची गरज : सीइओ वैदेही रानडे

Gramin Varta
133 Views

गणपतीपुळे येथे जिल्हास्तरीय सरस प्रदर्शनाचे उद्घाटन

वैभव पवार / गणपतीपुळे : ग्रामीण भागातील महिला विविध क्षेत्रांत सक्षमपणे कार्यरत असून जिल्हास्तरीय सरस प्रदर्शनात सहभागी झालेल्या स्वयंसहायता बचतगटांच्या महिलांचा उत्साह वाढवणे आणि त्यांच्या उत्पादनांना विक्रीसाठी प्रभावी प्रतिसाद मिळवून देणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी केले.

रत्नागिरी तालुक्यातील श्री क्षेत्र गणपतीपुळे येथील देवबाग परिसरात बुधवार, २४ डिसेंबर रोजी जिल्हास्तरीय सरस प्रदर्शनाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटक म्हणून बोलताना त्यांनी सांगितले की, सरस प्रदर्शनातून महिलांच्या हस्तकला, बुरुड काम, नर्सरी, कला-कस्तुरीच्या वस्तू, कोकणी उत्पादने तसेच पारंपरिक कोकणी खाद्यपदार्थ पर्यटकांना एकाच ठिकाणी उपलब्ध होत आहेत. नाताळ सुट्टीच्या काळात गणपतीपुळ्याला मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असल्याने या प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद मिळेल आणि महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणास निश्चितच चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

महिला बचतगट राज्य व राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये सातत्याने यश मिळवत असल्याचे त्यांनी नमूद केले. चिपळूण येथील हिरकणी बचतगटाला राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचे पारितोषिक, तसेच रत्नागिरी तालुक्यातील दोन बचतगटांना मिळालेली बक्षिसे ही या प्रगतीची साक्ष असल्याचेही त्यांनी सांगितले.

या उद्घाटनप्रसंगी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक विजयसिंह जाधव, जिल्हा अभियान व्यवस्थापक अयाज पिरजादे, जिल्हा विपणन व्यवस्थापक अमोल काटकर, गटविकास अधिकारी चेतन शेळके, गणपतीपुळे देवस्थानचे सरपंच निलेश कोल्हटकर, ग्रामपंचायत सरपंच कल्पना पक्ये, उपसरपंच संजय माने तसेच विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

जिल्हा ग्रामीण जीवनोन्नती अभियान व्यवस्थापन कक्ष, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा आणि जिल्हा परिषद रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने २४ ते २८ डिसेंबर या कालावधीत या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रदर्शनात एकूण ७५ स्टॉल असून त्यामध्ये उत्पादनांचे ६ आणि खाद्यपदार्थांचे १५ स्टॉल समाविष्ट आहेत. या माध्यमातून १०७ स्वयंसहायता समूह, चार महिला शेतकरी उत्पादक कंपन्या आणि एक उद्योग विकास केंद्रातील महिला सहभागी झाल्या आहेत.

या ठिकाणी बुरुड काम, लोकरीच्या विणकामाच्या वस्तू, इमिटेशन ज्वेलरी, शोभिवंत फुलझाडे, घरगुती मसाले तसेच विविध कोकणी उत्पादने माफक दरात उपलब्ध आहेत. प्रदर्शन काळात लोककला, लोकगीत, भारुड, सांस्कृतिक कार्यक्रम आणि स्टॉल प्रतिनिधींसाठी मनोरंजनात्मक उपक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे.

प्रदर्शनाच्या सांगता समारंभात उत्कृष्ट मांडणी व सर्वाधिक विक्री करणाऱ्या स्वयंसहायता समूहांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. पर्यटकांनी मोठ्या संख्येने या प्रदर्शनाला भेट देऊन कोकणातील विविध उत्पादने व रुचकर खाद्यपदार्थांचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन वैदेही रानडे व प्रकल्प संचालक विजयसिंह जाधव यांनी केले आहे.

Total Visitor Counter

3072989
Share This Article