गुहागर–चिपळूण एसटी बसमध्ये मद्यपान; चालक-वाहकावर गुन्हा दाखल

saurabhsalvi26@gmail.com
1 Min Read

चिपळूण : गुहागर–चिपळूण मार्गावरील एसटी बसमध्ये प्रवासादरम्यान मद्यपान केल्याचा प्रकार उघडकीस आल्याने एसटी महामंडळात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी संबंधित चालक व वाहकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून एसटी महामंडळाकडून त्यांच्यावर कडक शिस्तभंगाची कारवाई होण्याची शक्यता आहे.

राजेंद्र मोहन गोडसे (चालक) आणि संतोष महादेव हराळे (वाहक, गुहागर आगार) अशी गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे आहेत. सहाय्यक वाहतूक निरीक्षक अरविंद राजेशिर्के यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे.

पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, १८ डिसेंबर रोजी गोडसे व हराळे हे दोघे आपल्या ताब्यातील गुहागर–चिपळूण ही एसटी बस घेऊन येत असताना प्रवासादरम्यान मद्यपान करत असल्याचे प्रवाशांच्या निदर्शनास आले. काही प्रवाशांनी या प्रकाराबाबत तक्रार करत त्याचा व्हिडीओही तयार केला. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर एसटी प्रशासनात एकच खळबळ उडाली.

त्यानंतर सहाय्यक वाहतूक निरीक्षक अरविंद राजेशिर्के यांनी दिलेल्या तक्रारीवरून दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या संबंधित चालक व वाहक हे दोघेही रजेवर असून त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. मात्र तपासणी अहवाल अद्याप प्राप्त झालेले नसल्याने तत्काळ कारवाई करण्यात आलेली नाही.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *