GRAMIN SEARCH BANNER

तोंडली–पिलवली विद्यालयात ‘शाश्वत विद्युतीकरण’ प्रकल्पाचे लोकार्पण; ५५ विद्यार्थ्यांना सोलर लॅम्पचे वाटप

Gramin Varta
10 Views

सावर्डे: सह्याद्रि शिक्षण संस्था संचलित ह. भ. प. आ. बा. सावंत माध्यमिक विद्यालय, तोंडली–पिलवली येथे शाश्वत विकासाच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. ५ जानेवारी २०२६ रोजी विद्यालयात २ किलोवॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन आणि विद्यार्थ्यांना ५५ सोलर लॅम्पचे वाटप अत्यंत उत्साहात संपन्न झाले. ॲसेंडस फर्स्ट स्पेस कंपनी, ग्रीन इंडिया इनिशिएटिव्ह प्रा. लि., रोटरी क्लब ऑफ मुंबई बँद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स आणि दि बॉम्बे मिड ईस्ट रोटरी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या अभ्यासात विजेअभावी खंड पडू नये आणि शालेय स्तरावर अपारंपरिक ऊर्जेचा वापर वाढावा, हा यामागचा मुख्य उद्देश आहे.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विद्यालयाचे चेअरमन दिपक सावंत यांनी भूषविले. प्रमुख अतिथी म्हणून रोटरी क्लब ऑफ मुंबई बँद्रा कुर्ला कॉम्प्लेक्सचे अध्यक्ष रोटेरियन सुयोग जयंत गंगावणे उपस्थित होते, ज्यांच्या सहकार्याने हा प्रकल्प साकार झाला. तसेच ‘सोलार मॅन ऑफ इंडिया’ पुरस्कारप्राप्त डॉ. सचिन द्रुपदा यशवंत शिगवण यांची विशेष उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांनी ईशस्तवन व स्वागतगीत सादर केले, त्यानंतर मुख्याध्यापक सुखदेव मस्के यांनी प्रास्ताविकातून शाळेची प्रगती आणि सोलर प्रकल्पाची गरज स्पष्ट केली. या प्रसंगी सह्याद्री क्रीडा संग्राम स्पर्धेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचाही मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

रोटेरियन सुयोग गंगावणे यांनी आपल्या भाषणात शिक्षण संस्थांमध्ये शाश्वत ऊर्जेचा वापर वाढवणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले. डॉ. सचिन शिगवण यांनी सौर ऊर्जा हा भविष्यातील मुख्य स्रोत असल्याचे सांगत, अशा प्रकल्पांमुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणपूरक दृष्टिकोन निर्माण होईल असा विश्वास व्यक्त केला. अध्यक्षीय भाषणात दिपक सावंत यांनी या प्रकल्पामुळे शाळेच्या वीज खर्चात मोठी बचत होणार असल्याचे नमूद केले. सामाजिक कार्यकर्ते संदीप सावंत, सरपंच मेघ सावंत आणि सरपंच रेणुका आगरे यांनीही या उपक्रमाचे कौतुक करत ग्रामीण भागासाठी हे प्रेरणादायी पाऊल असल्याचे सांगितले.

या कार्यक्रमाला रघुनाथ सावंत, विठोबा सावंत, ग्रामसेवक कदम यांच्यासह पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा प्रकल्प यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक सुखदेव म्हस्के, शिक्षक हेमंत पाकळे, हर्षाली पाकळे, श्री. कोकमकर व श्री. गुरव यांनी परिश्रम घेतले. या यशस्वी उपक्रमाबद्दल सह्याद्रि शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष आमदार शेखर निकम, सचिव महेश महाडिक आणि ज्येष्ठ संचालक शांताराम खानविलकर यांनी विद्यालयाचे व सहभागी संस्थांचे अभिनंदन केले आहे.

Total Visitor Counter

3073091
Share This Article