GRAMIN SEARCH BANNER

सावर्डे विद्यालयाचा तेजस राऊत ‘सर्वोत्तम विद्यार्थी गोडबोले पुरस्काराने’ सन्मानित; विद्यालयाची पुरस्काराची रौप्य महोत्सवी परंपरा कायम

Gramin Varta
135 Views

सावर्डे: चतुरंग प्रतिष्ठान, मुंबई यांच्यावतीने कोकणातील गुणवंत विद्यार्थ्यांना दिला जाणारा मानाचा ‘सर्वोत्तम विद्यार्थी गोडबोले पुरस्कार’ यावर्षी सह्याद्री शिक्षण संस्थेच्या गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सावर्डे येथील तेजस राऊत या विद्यार्थ्याला प्रदान करण्यात आला. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांमधील २४३ विद्यार्थ्यांनी या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी मुलाखती दिल्या होत्या. त्यातून निवडण्यात आलेल्या ३६ उत्कृष्ट विद्यार्थ्यांमध्ये तेजसने आपले स्थान निश्चित केले. या निवडक विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुणे निवृत्त मेजर जनरल शिशिर महाजन, प्रसिद्ध कीर्तनकार डॉ. चारुदत्त आफळे, डॉ. प्रसाद देवधर, डॉ. मिलिंद गोखले आणि प्राध्यापक वैभव कानिटकर यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह, रोख रक्कम व पुस्तके देऊन गौरविण्यात आले.

पुरस्कार विजेता तेजस राऊत हा अभ्यासासोबतच तबला, ढोलकी वादन आणि चित्रकला अशा अष्टपैलू कला जोपासणारा विद्यार्थी आहे. त्याने तबला वादनाच्या प्रवेशिका व मध्यमा प्रथम परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण केल्या आहेत. विज्ञान शाखेची निवड करून भविष्यात तंत्रज्ञान क्षेत्रात यशस्वी व्यवसाय करण्याचा त्याचा निर्धार असून, त्याच्यातील नेतृत्वगुण आणि शिस्तीचा विचार करून परीक्षकांनी त्याची या पुरस्कारासाठी निवड केली. विशेष म्हणजे, सर्वोत्तम विद्यार्थी गोडबोले पुरस्काराच्या रौप्य महोत्सवी वर्षापर्यंत गोविंदराव निकम माध्यमिक विद्यालयाने सलग २५ वर्षे हा पुरस्कार मिळवण्याचा ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. विद्यालयाच्या या सातत्यपूर्ण यशाबद्दल चतुरंग प्रतिष्ठानच्या वतीने संस्थेचे विशेष कौतुक करण्यात आले.

तेजस राऊतला या यशासाठी विद्यालयातील सहाय्यक शिक्षिका गौरी शितोळे यांचे मार्गदर्शन लाभले. आपल्या यशाचे श्रेय शाळेसह आजी-आजोबा आणि पालकांना असल्याचे तेजसने यावेळी आवर्जून नमूद केले. या यशाबद्दल सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष तथा आमदार शेखर निकम यांनी तेजसचे विशेष कौतुक करून त्याला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. संस्थेचे सचिव महेश महाडिक, शालेय समितीचे चेअरमन शांताराम खानविलकर, प्राचार्य राजेंद्र वारे, उपप्राचार्य विजय चव्हाण, शिक्षकवृंद आणि पालक वर्गाकडून तेजसवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Total Visitor Counter

3377042
Share This Article