GRAMIN SEARCH BANNER

चिपळूणमधील टेरव ग्रामपंचायतीत प्रभारी सरपंचांविरोधात अविश्वास ठराव

Gramin Varta
77 Views

चिपळूण : टेरव ग्रामपंचायतीत सध्या तीव्र सत्तासंघर्ष उफाळून आला असून प्रभारी सरपंच रिया म्हालीम यांच्या कारभाराविरोधात बहुसंख्य सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केला आहे. सदस्यांना विश्वासात न घेता मनमानी कारभार केल्याचा ठपका ठेवत नऊपैकी सात ग्रामपंचायत सदस्यांनी तहसीलदारांकडे अधिकृतरीत्या ठराव सादर केला आहे.

टेरव ग्रामपंचायतीचे थेट निवडून आलेले सरपंच किशोर कदम हे रयत संघटनेच्या पाठिंब्यावर सत्तेत आले होते. मात्र अलीकडच्या काळात गावातील राजकीय समीकरणे झपाट्याने बदलली. रयत संघटनेत झालेल्या अंतर्गत उलथापालथीनंतर कदम यांना संघटनेतून बाजूला करण्यात आले आणि नव्या नेतृत्वाला पुढे आणण्यात आले.

दरम्यान, सरपंच किशोर कदम यांची प्रकृती खालावल्याने ते वैद्यकीय रजेवर आहेत. त्यांच्या अनुपस्थितीत उपसरपंच रिया म्हालीम यांच्याकडे प्रभारी सरपंचपदाची सूत्रे सोपविण्यात आली. मात्र या कालावधीत ग्रामपंचायत सदस्यांना डावलून निर्णय घेतले जात असल्याचा आरोप सदस्यांनी केला आहे. त्यामुळे प्रभारी सरपंचांचा कारभार विश्वासार्ह राहिलेला नसल्याचे स्पष्ट करत अविश्वास ठराव दाखल करण्यात आला.

या ठरावावर अनंत चांदिवडे, संतोष मोहिते, महेंद्र खांबे, मानसी कदम, रिया कदम, वनिता पालकर आणि सुप्रिया वास्कर यांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत. ठरावाची तातडीने पडताळणी करून विशेष सभा बोलावण्यात यावी, अशी मागणी सदस्यांनी तहसीलदारांकडे केली असून पुढील राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Total Visitor Counter

3199305
Share This Article