GRAMIN SEARCH BANNER

भाजपचे अनिकेत पटवर्धन यांची राजकारणातून माघार, सोशल मीडियावर पोस्टद्वारे माहिती

Gramin Varta
302 Views

रत्नागिरी : जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपासून अनिकेत पटवर्धन यांनी स्वतःला पूर्णपणे दूर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात त्यांनी सोशल मीडियावर भूमिका मांडत यापुढे कोणत्याही निवडणूक प्रक्रियेत सहभागी न होण्याचे स्पष्ट केले आहे.

पटवर्धन यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, जिल्ह्यातील नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांदरम्यान त्यांनी घेतलेली भूमिका अनेकांना मान्य नसल्याचे सातत्याने जाणवले. भारतीय जनता पक्षासाठी प्रामाणिकपणे काम करताना पक्षहित आणि संघटनात्मक जबाबदाऱ्या लक्षात घेऊन आपण प्रयत्न केले, मात्र त्या प्रयत्नांना अपेक्षित स्वीकार मिळाला नाही, असे त्यांनी नमूद केले.

रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षासाठी जे जे काम सोपवण्यात आले ते पार पाडण्याचा प्रयत्न केला, तरीही नगरसेवक आणि नगराध्यक्ष निवडणुकीतील भूमिकेबाबत असंतोष व्यक्त झाल्याचे त्यांनी सूचित केले. याच पार्श्वभूमीवर आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये कोणतीही पक्षीय जबाबदारी स्वीकारणार नसल्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी जाहीर केले.
यापुढे रत्नागिरी जिल्ह्यातील नगरपालिका, नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच ग्रामपंचायत निवडणुकांशी आपला कोणताही संबंध राहणार नसून, भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक कामातूनही आपण बाजूला होत असल्याचे पटवर्धन यांनी स्पष्ट केले आहे. तसेच, आपण सहभागी असलेल्या सर्व भाजपच्या सोशल मीडिया ग्रुपमधून स्वतःहून बाहेर पडत असल्याची माहिती देत, आपल्या हातून झालेल्या चुका असल्यास त्याबद्दल त्यांनी सर्वांची दिलगिरी व्यक्त केली आहे.

Total Visitor Counter

3199275
Share This Article