संगमेश्वर/एजाज पटेल : संगमेश्वर येथे नव्याने उभारण्यात आलेल्या सुसज्ज एसटी बसस्थानक इमारतीचे काही महिन्यांपूर्वी पालकमंत्री यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. या नव्या इमारतीमुळे प्रवाशांना पूर्वीपेक्षा अधिक सोयी-सुविधा मिळतील, अशी अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात नियोजनशून्य कारभारामुळे प्रवाशांच्या अडचणींमध्ये वाढ झाल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.
पूर्वीच्या जुन्या बसस्थानकात प्लॅटफॉर्म क्रमांक नसतानाही बसेस कोणत्या मार्गावर जाणार आहेत हे सहज समजत असे, प्रवाशांना बस शोधण्यासाठी फारशी धावपळ करावी लागत नव्हती. मात्र नव्या बसस्थानकात फ्लॅटफॉर्म एकीकडे आणि बसगाड्या दुसरीकडे असल्यामुळे प्रवाशांना गाड्या शोधताना मोठा त्रास सहन करावा लागतो. आगाराच्या रचनेतील त्रुटींमुळे फ्लॅटफॉर्मवर बस लावणे चालकांसाठी कसरतीचा खेळ बनला आहे, तरीही बस व्यवस्थित बसवता येत नाही.
याचा थेट फटका प्रवाशांना बसतो. अनेकदा प्रवाशांना बस शोधत असतानाच संबंधित बस मार्गस्थ झाल्याच्या घटना घडतात. विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अपंग प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत.
सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या दृष्टीने बसस्थानकाची रचना करताना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) नियोजन मार्गदर्शक तत्त्वांनुसार प्रवासी प्रवाह, प्लॅटफॉर्म मांडणी आणि ज्येष्ठ व दिव्यांगांसाठी सुलभता यांचा विचार करणे बंधनकारक आहे.
मात्र संगमेश्वर बसस्थानकाच्या बाबतीत बांधकामपूर्व नियोजन प्रक्रिया राबवली गेली की नाही, असा सवाल उपस्थित होत आहे.
लोकार्पण करून इमारत सुरु करणे पुरेसे नसून, ती प्रवाशांच्या उपयोगाची ठरली पाहिजे, ही जबाबदारी एसटी प्रशासनाची आहे. त्यामुळे या बसस्थानकातील नियोजनातील त्रुटी तात्काळ दूर करून, फ्लॅटफॉर्म आणि बसगाड्यांची व्यवस्था व्यवस्थित राबवावी, अशी जोरदार मागणी प्रवाशांकडून होत आहे.
संगमेश्वर एसटी बसस्थानक सुसज्ज इमारत पण नियोजनाचा अभाव, प्रवाशांचे हाल








