GRAMIN SEARCH BANNER

कामाच्या बिलासाठी ७ हजारांची लाच घेणारा उपअभियंत्यावर अखेर गुहागर पोलिसांत गुन्हा दाखल

Gramin Varta
41 Views

गुहागर : कामाच्या बिलासोबत जोडलेल्या फोटोंवर सही करण्यासाठी कंत्राटदाराच्या सुपरवायझरकडून ७ हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या गुहागर जिल्हा परिषद बांधकाम उपविभागाच्या उपअभियंत्याला रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले आहे. याप्रकरणी संजय तुळशीराम सळमाखे (वय ५६, रा. शृंगारतळी शिक्षक कॉलनी, गुहागर) या वर्ग-१ च्या अधिकाऱ्यावर गुहागर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ओमकार जाधव हे कंत्राटदार श्री. तावडे यांच्याकडे सुपरवायझर म्हणून काम करतात. त्यांनी गुहागर तालुक्यातील मौजे वेळंब ग्रामपंचायत कार्यालयाचे बांधकाम केले होते. या कामाचे पहिले धावते देयक काढण्यासाठी प्रस्तावासोबत कामाचे फोटो जोडले होते. या फोटोंवर उपअभियंत्याची स्वाक्षरी आवश्यक होती. ही स्वाक्षरी करण्यासाठी लोकसेवक संजय सळमाखे यांनी १६ डिसेंबर रोजी तक्रारदाराकडे ७ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.

तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीने १६ डिसेंबर रोजी दुपारी गुहागर येथील उपअभियंता कार्यालयात सापळा रचला. यावेळी स्वतःच्या दालनातच पंचांसमक्ष ७ हजार रुपयांची लाच स्वीकारताना संजय सळमाखे यांना रंगेहाथ पकडण्यात आले. याप्रकरणी एसीबीचे पोलीस निरीक्षक सुहास हरिदास रोकडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुहागर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा १९८८ (सुधारणा २०१८) चे कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्यावरच कारवाई झाल्याने जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात खळबळ माजली आहे.

Total Visitor Counter

3395347
Share This Article