GRAMIN SEARCH BANNER

संगमेश्वर: गुरुजी झाले डॉक्टर! प्रतिकूल परिस्थितीवर मात करत प्राथमिक शिक्षक रितेश बावनकर यांनी मिळवली पीएच.डी.

Gramin Varta
450 Views

धामणी/ सचिन यादव: जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर कोणतीही गोष्ट साध्य करता येते, याचाच एक आदर्श संगमेश्वर तालुक्यातील कोळंबे २ नंबर शाळेत कार्यरत असणारे प्राथमिक शिक्षक रितेश बावनकर यांनी घालून दिला आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत खचून न जाता उच्च शिक्षण सुरू ठेवून बावनकर यांनी नुकतीच पीएच.डी. पदवी प्राप्त केली असून, त्यांच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. मूळचे भंडारा जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या बावनकर यांची मे २०२४ मध्ये कोळंबे शाळेत नियुक्ती झाली. २०१२ मध्ये डी.एड. पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपले शिक्षण थांबवले नाही. त्यांनी अर्थशास्त्र आणि समाजशास्त्र या विषयांत एम.ए. पदवी मिळवली आणि त्यानंतर मास्टर ऑफ सोशल वर्क ही पदवीही संपादित केली.

शिक्षक भरती प्रक्रियेतील दिरंगाईमुळे त्यांना तब्बल दहा वर्षे नोकरीची प्रतीक्षा करावी लागली, मात्र या काळात त्यांनी स्वतःला अभ्यासात गुंतवून ठेवले. त्यांनी सात वेळा टीईटी आणि सीटीईटी परीक्षा उत्तीर्ण होण्याचा बहुमान मिळवला. इतकेच नव्हे तर प्राध्यापक पदासाठी आवश्यक असणाऱ्या एम.फिल, नेट आणि सेट या परीक्षांमध्येही त्यांनी घवघवीत यश संपादन केले. नोकरी मिळेपर्यंत त्यांनी भंडारा येथील आठवले समाजकार्य महाविद्यालयात तीन वर्षे तासिका तत्त्वावर प्राध्यापक म्हणून ज्ञानदानाचे कार्य केले. अलीकडेच सातारा येथे झालेल्या विभागस्तरीय स्पर्धेत ‘व्यक्ती अभ्यास’ गटात त्यांनी पाचवा क्रमांक पटकावून राज्य स्तरावर झेप घेतली आहे.

लेखन क्षेत्रातही त्यांनी आपला ठसा उमटवला असून, स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त ठरणारे ‘जी.एस. वनलायनर’ आणि ‘ट्रेड युनियनिझम अँड इंडस्ट्रियल रिलेशन’ ही पुस्तके प्रकाशित केली आहेत. त्यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना २००५ अंतर्गत मजुरांच्या सामाजिक, आर्थिक व आरोग्य विषयक स्थितीचे अध्ययन’ या विषयावर आपला शोधप्रबंध सादर केला होता. त्यांच्या या शोधकार्यासाठी त्यांना डॉ. नरेश कोलते यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या या उत्तुंग यशाबद्दल कुरधुंडा उर्दू केंद्राच्या वतीने त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. या प्रसंगी विस्तार अधिकारी शशिकांत त्रिभुवने, केंद्रप्रमुख मीनाक्षी नाचणकर, चंद्रशेखर जाधव, आनंद देशपांडे, संदेश सावंत, रमेश खापरे यांसह अनेक मान्यवर आणि मित्रपरिवाराने उपस्थित राहून बावनकर यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Total Visitor Counter

3376010
Share This Article