GRAMIN SEARCH BANNER

मालगुंड येथे ग्रामीण, कृषी व सहकार मराठी साहित्य संमेलनाचे ‘लोगो’ अनावरण संपन्न

Gramin Varta
146 Views

रत्नागिरी: कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था, मांडकी पालवण यांच्या वतीने आयोजित आगामी शासन पुरस्कृत राज्यस्तरीय ग्रामीण, कृषी व सहकार मराठी साहित्य संमेलनाच्या लोगोचे अनावरण आज मालगुंड येथील कवी केशवसुत स्मारक येथे उत्साहात पार पडले. दि. १३ ते १५ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत मांडकी पालवण येथील भव्य क्रीडांगणावर हे संमेलन होणार असून, त्याचे औपचारिक संकेत देणारा हा सोहळा महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा रत्नागिरीच्या अध्यक्षा तथा नगराध्यक्षा सौ. शिल्पाताई सुर्वे यांच्या हस्ते संपन्न झाला.

याप्रसंगी बोलताना सौ. शिल्पाताई सुर्वे यांनी ग्रामीण भागाचा कणा असलेले ग्रामीण साहित्य, कृषी आणि सहकार या तीनही विषयांना एकाच व्यासपीठावर आणण्याचा हा प्रयोग राज्यात प्रथमच होत असल्याचे नमूद केले. या अभिनव संमेलनामुळे ग्रामीण जीवनातील विविध पैलू साहित्यातून अधिक प्रभावीपणे समोर येतील, असा विश्वास व्यक्त करत त्यांनी तमाम साहित्यप्रेमींना या संमेलनासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले. तत्पूर्वी, शिल्पाताई सुर्वे यांची रत्नागिरी नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल संमेलन संयोजन समितीच्या वतीने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाला मालगुंडच्या सरपंच सौ. श्वेता थेऊर, साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे, नियोजन समिती अध्यक्ष प्रकाश देशपांडे, प्रमुख कार्यवाह निखिल चोरगे, कोषाध्यक्ष अजय चव्हाण आणि कवी केशवसुत स्मारकाच्या कार्यवाह नलिनी खेर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. आगामी तीन दिवसांच्या या मुख्य संमेलनामध्ये विविध साहित्यिक कार्यक्रम, परिसंवाद आणि सांस्कृतिक घडामोडींची रेलचेल असणार असून, आजच्या लोगो अनावरण कार्यक्रमाला रत्नागिरी जिल्ह्यातील साहित्यिकांनी मोठी गर्दी केली होती.

Total Visitor Counter

3342631
Share This Article