रत्नागिरी: शहरातील माळनाका परिसरातील एका नामांकित गृहनिर्माण संस्थेत पाण्याची टाकी पाहण्यासाठी गेलेल्या ५० वर्षीय व्यक्तीचा फिट येऊन पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. दिलीप धकातू पेंडखळकर (वय ५०, मूळ रा. उन्हाळी कुभारवाडी, ता. राजापूर, सध्या रा. निवासी गृहनिर्माण संस्था, माळनाका, रत्नागिरी) असे मृत व्यक्तीचे नाव असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २४ मार्च रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास दिलीप पेंडखळकर हे आपल्या निवासस्थानी होते.
नेहमीप्रमाणे सोसायटीमधील पाण्याची टाकी भरली आहे की नाही, हे पाहण्यासाठी ते टाकीजवळ गेले होते. मात्र, त्याच वेळी त्यांना अचानक फिट आल्याने त्यांचा तोल गेला आणि ते जमिनीवर कोसळले. टाकीजवळ असलेल्या लादीवर त्यांचे डोके आदळल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली. घटनेची माहिती मिळताच इमारतीमधील रहिवाशांनी तातडीने त्यांच्या पत्नी सौ. वैष्णवी पेंडखळकर यांना संपर्क करून बोलावून घेतले.
रहिवाशांच्या मदतीने त्यांना तातडीने रिक्षामधून जिल्हा शासकीय रुग्णालय, रत्नागिरी येथे उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले. या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस करत आहेत.






