GRAMIN SEARCH BANNER

हजारो कोटी रुपये बुडवणाऱ्या ‘टीडब्ल्यूजे’ घोटाळ्यातील मुख्य आरोपी संकेश घाग सोबत हॉटेलमध्ये जेवणाऱ्या पोलिसांवर होणार कारवाई

Gramin Varta
472 Views

रत्नागिरी: हजारो कोटी रुपयांच्या ‘टीडब्ल्यूजे’ घोटाळ्यातील मुख्य आरोपी संकेश घाग याला न्यायालयात हजर करण्यापूर्वी हॉटेलमध्ये जेवण दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी संबंधित चिपळूण पोलिसांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे. बुधवारी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. टीडब्ल्यूजे कंपनीचा संचालक असलेला संकेश घाग याने हजारो गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत. अनेक महिने फरार असलेल्या घागला चिपळूण पोलिसांनी पुणे येथून अटक केली होती. मात्र, २७ जानेवारी रोजी त्याला न्यायालयात हजर करण्यापूर्वी पोलिसांनी चक्क एका हॉटेलमध्ये नेऊन जेवण दिल्याने नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला होता. या गैरप्रकाराबाबत पोलिसांचे स्पष्टीकरण मागवण्यात आले असून चौकशीनंतर पुढील कारवाई केली जाईल, असे बगाटे यांनी स्पष्ट केले.

याच पत्रकार परिषदेत बोलताना बगाटे यांनी आगामी पोलीस भरती प्रक्रियेबाबतही उमेदवारांना सतर्क राहण्याचे आवाहन केले. जिल्हा पोलीस दलातील शिपाई व चालक पदासाठी भरती प्रक्रिया सुरू होत असून, या काळात कोणत्याही बोगस दलालांच्या किंवा आमिषांच्या जाळ्यात अडकू नका, असे त्यांनी सांगितले.

कोणी पैशांची मागणी करत असल्यास तातडीने पोलीस अधीक्षक कार्यालय किंवा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असेही त्यांनी नमूद केले. भरती प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी पोलीस दल सज्ज असून फसवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला. याचसोबत, रत्नागिरी पोलीस दलातील अनेक गाड्या आता कालबाह्य झाल्या असून नवीन गाड्यांची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे. लवकरच नवीन वाहने उपलब्ध झाल्यास पोलिसांच्या कामकाजाला अधिक गती मिळेल, असा विश्वासही पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी यावेळी व्यक्त केला.

Total Visitor Counter

3223529
Share This Article