GRAMIN SEARCH BANNER

खेडच्या रणरागिणीची झेप; बोरजची ऋतुजा सनगरे भारत-बांगलादेश सीमेवर देशरक्षणासाठी सज्ज

Gramin Varta
160 Views

खेड: शूरवीरांची आणि लष्करी सेवेची मोठी परंपरा लाभलेल्या खेड तालुक्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. तालुक्यातील बोरज गावची सुकन्या ऋतुजा राजेंद्र सनगरे हिची भारतीय सीमा सुरक्षा दलात (बीएसएफ) निवड झाली असून, ती आता भारत-बांगलादेश सीमेवर देशरक्षणाचे कर्तव्य बजावणार आहे. पहिल्या महायुद्धापासून खेडच्या मातीने अनेक शूर सैनिक देशाला दिले असून, याच परंपरेचा वारसा आता कन्याही समर्थपणे चालवत असल्याचे ऋतुजाच्या यशामुळे सिद्ध झाले आहे. ऋतुजाचे प्राथमिक शिक्षण निगडे बोरज येथील आदर्श शाळा क्रमांक १ मध्ये झाले, तर माध्यमिक शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल बोरज आणि उच्च शिक्षण लवेल येथील पद्मश्री अण्णासाहेब बेहरे ज्युनिअर कॉलेजमध्ये पूर्ण झाले.

शिक्षण घेत असतानाच तिने भारतीय सैन्यदलात भरती होण्याचा ठाम निश्चय केला होता. आपले ध्येय गाठण्यासाठी तिने २०२३ मध्ये बोरज येथील नॅशनल अकॅडमी कॅम्पमध्ये प्रवेश घेतला. तिथे मार्गदर्शक किशोर आदावडे आणि दीक्षिता आदावडे यांच्या मार्गदर्शनाखाली तिने पोलीस भरती आणि वनरक्षक पदासाठीही प्रयत्न केले, मात्र तिचे मुख्य लक्ष सैन्यदलावरच होते. अखेर १४ डिसेंबर २०२४ रोजी तिच्या कष्टाला फळ आले आणि तिची निवड निश्चित झाली. त्यानंतर पंजाबमधील खडका कॅम्प येथे तिने १३ महिन्यांचे अत्यंत खडतर लष्करी प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केले. प्रशिक्षणांनंतर तिची पहिली नियुक्ती आसाममधील गुवाहाटी सेक्टरमध्ये भारत-बांगलादेश सीमेवर झाली असून, १९ फेब्रुवारी २०२६ रोजी ती आपल्या कर्तव्यावर रुजू होत आहे. ऋतुजाच्या या यशामुळे बोरज गावातील वातावरण उत्साहाने रसरसले असून संपूर्ण तालुक्यातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Total Visitor Counter

3387166
Share This Article