रत्नागिरी: श्री क्षेत्र नाणीजधाम येथील जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या फोटोंचे बनावटीकरण करून ते सोशल मीडियावर प्रसारित केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महाराजांच्या प्रतिमेचा गैरवापर करून भाविकांची दिशाभूल केल्याप्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात एका संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सुनील रामलोचनसिंग ठाकूर (वय ५९, रा. नाणीज) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, ‘ऑफिशियल अनिल जाधव’ (official_anil_jadhav) या नावाच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक प्रोफाइलवरून हा प्रकार घडला आहे. २२ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास नाणीजधाम येथील तांत्रिक विभागाला सोशल मीडियावर काही आक्षेपार्ह पोस्ट आढळून आल्या. संबंधित युजरने जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या फोटोंसोबत स्वतःचा फोटो सॉफ्टवेअरच्या मदतीने अशा प्रकारे जोडला की, जणू काही महाराजांनी त्याच्यासोबत प्रत्यक्ष फोटो काढला आहे. प्रत्यक्षात असा कोणताही फोटो काढलेला नसतानाही, तो खरा असल्याचे भासवून सोशल मीडियावर शेअर करण्यात आला.या बनावट फोटोंसोबतच दिशाभूल करणारा मजकूरही लिहिला असून, यामुळे महाराजांच्या लौकिकास बाधा निर्माण करण्याचा आणि लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या गंभीर प्रकाराची दखल घेत ६ मार्च रोजी रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कायदा कलम ३३६(४) आणि ३३६(२) अन्वये गुन्हा रजिस्टर क्रमांक ३३/२०२६ नुसार नोंद केला आहे. सोशल मीडियाचा वापर करून एका अध्यात्मिक संस्थेच्या प्रमुखांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केल्यामुळे परिसरात चर्चेला उधाण आले असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
नाणीजधामच्या जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराजांचे फोटो मॉर्फ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल






