GRAMIN SEARCH BANNER

खेड : मुंबई-गोवा महामार्गावर झालेल्या अपघातात स्वतःच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या १७ वर्षीय चालकावर गुन्हा

Gramin Varta
313 Views

खेड:मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर खेड जवळील माजलेकर हॉटेल परिसरातील मोरीजवळ शनिवारी रात्री झालेल्या एका भीषण दुचाकी अपघातात १७ वर्षीय अल्पवयीन मुलाचा मृत्यू झाला असून, त्याच्यासोबत असलेला १८ वर्षीय तरुण गंभीर जखमी झाला आहे. या अपघाताप्रकरणी मृत चालकानेच आपली दुचाकी हयगयीने आणि निष्काळजीपणाने चालवून स्वतःच्या मृत्यूस व मित्राच्या दुखापतीस कारणीभूत ठरल्याप्रकारणी त्याच्याविरुद्ध खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अद्वैत प्रवीण गिते (वय १७ वर्षे ५ महिने, मूळ रा. तिसंगी गितेवाडी, सध्या रा. खोंडे, खेड) हा आपल्या ताब्यातील रॉयल एनफिल्ड जी.टी. ६५० (क्र. एम.एच. ०८ डी.बी. ५७९०) ही दुचाकी घेऊन खेडच्या दिशेने जात होता. त्याच्यासोबत अथर्व गणपत परब (वय १८, रा. मंडणगड) हा मित्र मागे बसला होता. शनिवारी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास माजलेकर हॉटेलजवळील मोरीजवळ अद्वैतचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि ही दुचाकी भीषण अपघाताला बळी पडली.

या अपघातात गंभीर दुखापत झाल्याने चालक अद्वैत गिते याचा जागीच मृत्यू झाला, तर मागे बसलेला अथर्व परब हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.याप्रकरणी शुभम विश्वास देवळेकर (वय २७, रा. खवटी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून खेड पोलिसांनी मृताविरुद्ध कायदेशीर कारवाई केली आहे. मयत अद्वैत गिते याने आपली दुचाकी अतिशय वेगाने आणि रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून चालवल्याने हा अपघात घडल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ४९/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०६(१), २८१, १२५(अ), १२५(ब) आणि मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऐन तारुण्यात एका अल्पवयीन मुलाचा अशा अपघाती मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Total Visitor Counter

3199256
Share This Article