रत्नागिरी: समाजातील प्रत्येक नागरिकाला आणि तळागाळातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत न्याय पोहचायला हवा. संविधानाने जे अधिकार बहाल केलेले आहेत, ते सन्मानाने मिळायला हवेत, असे मार्गदर्शन पालक न्यायमूर्ती माधव जामदार यांनी केले.
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद आणि लांजा तालुका वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने लांजा येथील श्रीराम कुसुमताई सदाशिव वंजारे महाविद्यालयाच्या मैदानावर विधी सेवा महाशिबीर व शासकीय योजनांचा महामेळावा काल पार पडला. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती तथा पालक न्यायमूर्ती श्री. जामदार यांच्या हस्ते हस्ते आम्रवृक्षाला पाणी देऊन उद्घाटन झाले. याप्रसंगी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण विनोद जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, अपर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव राजेंद्र पाटील, लांजा तालुका वकील संघाचे अध्यक्ष सदानंद गांगण, पोलीस उपअधिक्षक सुरेश कदम, रत्नागिरी वकील संघाचे अध्यक्ष विलास पाटणे आदी उपस्थित होते.
पालक न्यायमूर्ती श्री. जामदार म्हणाले, हा महामेळावा समाजातील शेवटच्या माणसासाठी आहे. तळागळातील माणसांचा कार्यक्रम आहे. महाविद्यालयाच्या मैदानावर हा होत आहे. महाविद्यालयातील प्रत्येकाच्या आठवणी भावूक असतात. सळसळतं तारुण्य हे महाविद्यालयाची ओळख असते. सळसळत्या उत्साहाने शासनाच्या विविध योजनांचा लाभ हा समाजातील प्रत्येक व्यक्तींपर्यंत या महामेळाव्यामधून पोहचवावा. संविधानाने जे अधिकार बहाल केले आहेत, ते शेवटच्या व्यक्तीपर्यंत सन्मानाने मिळायला हवेत. दुर्बल घटकांना त्यांच्या अधिकाराची जाणीव करुन देणारा हा महामेळावा आहे. सामान्य माणसाच्या गरजा उंचावण्यासाठी शासनाच्या योजना आखणे आणि त्याचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहचविणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे.
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. जाधव म्हणाले, सामाजिक न्यायासाठी एक पाऊल पुढे टाकून हा महामेळावा आयोजित करण्यात आला आहे. सर्व योजनांची माहिती एकाच जागी कशा मिळतील, यासाठी या मेळाव्यातून प्रयत्न होणार आहेत. विविध शासकीय विभागांच्या सर्व योजनांची माहिती एकत्र करुन त्याची डिजीटल पुस्तिका करण्यात आली आहे. तिचा वापर राज्यभर करता येईल.
मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती रानडे म्हणाल्या, जिल्हा परिषदेला मिनी मंत्रालय म्हटले जाते. ग्रामीण भागातील सर्वसामान्य माणसांना विशेषत: दिव्यांग महिला यांच्या सक्षमीकरणासाठी मुख्य फोकस ठेवला जातो. त्यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शिबीरे घेतली जातात. दिव्यांगांसाठीची तयार करण्यात आलेल्या पुस्तिकेचे प्रकाशन मंडणगड येथील न्यायालय इमारत लोकार्पण प्रसंगी करण्यात आले आहे. महिला सक्षमीकरणासाठी उमेदेचे अतिशय चांगले काम सरस भरविली जातात. त्यामध्ये राज्याबाहेरसुध्दा रत्नागिरीच्या स्टॉलना मागणी असते. रस शिरवाळे, पानगा, आंबोळी, घावण याला राज्याबाहेर सुध्दा चांगली मागणी आहे. सिंधुरत्न समृध्द योजनेमधून टुरिस्ट व्हॅल, हाऊस बोटी महिला प्रभाग संघाना देण्यात आल्या आहेत. पाणी पुरवठा योजना देखील चालविण्यासाठी महिलांना देण्यात आलेली आहे.
एचपीव्ही लस मुलींना देण्यासाठी पुढाकार घ्यावा
जिल्हा नियोजन समिती निधीच्या माध्यमातून 9 ते 14 वयोगटातील मुलींसाठी कॅन्सरला दूर ठेवण्यासाठी राज्यात सर्वप्रथम रत्नागिरी जिल्ह्यात एचपीव्ही लस देण्यात येत आहे. आज अखेर 10 हजार मुलींना ही लस देण्यात आलेली आहे. एकाही मुलीला याची रिअॕक्शन आलेली नाही. राज्य शासनामार्फत जिल्ह्यातील मुलींना सध्या ही लस देण्यात येत आहे. ती मुलींना देण्यासाठी पालकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन श्रीमती रानडे यांनी आवर्जुन केले.
यावेळी पोलीस उपअधीक्षक श्री. कदम, श्री. गलांडे यांनीही मनोगत व्यक्त केले.विधी सेवा प्राधिकरण सचिव श्री. पाटील यांनी प्रास्ताविकामध्ये सविस्तर माहिती दिली. प्रातिनिधीक स्वरुपात विविध योजनांच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्र, धनादेश, क्रीडा साहित्य , व्हीलचेअर, हेल्मेट आदीचे वाटप करण्यात आले. सर्व योजनांची सविस्तर क्युअर कोडसह एकत्रित माहिती देण्यात आली. पुस्तिकेचे प्रकाशनही यावेळी करण्यात आले.जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधून आलेल्या लाभार्थ्यांची विशेषत: महिला वर्गाची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.






