GRAMIN SEARCH BANNER

खेड : निळीक येथे शेतात भाजावळ करताना चक्कर येऊन वृद्धाचा आगीत होरपळून मृत्यू

Gramin Varta
109 Views

खेड: तालुक्यातील निळीक येथील एका ६५ वर्षीय वृद्धाचा शेतीचे काम करत असताना आगीत होरपळून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. बशीर महामूद चौगुले (वय ६५, रा. निळीक मोहल्ला, ता. खेड) असे मृताचे नाव असून, रविवारी ही हृदयद्रावक घटना घडली. उन्हाच्या तीव्रतेमुळे चक्कर आल्याने ते थेट भाजावळीच्या आगीत पडले आणि त्यातच त्यांचा अंत झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २२ मार्च रोजी सकाळी १० ते सायंकाळी ४:३० च्या सुमारास बशीर चौगुले हे निळीक गावातील ‘खलाटी’ नावाच्या ठिकाणी शेतीच्या कामासाठी गेले होते. उन्हाळ्याचे दिवस असल्याने पुढील हंगामाच्या पूर्वतयारीसाठी ते शेतात भाजावळ करत होते. काम करत असतानाच उन्हाचा कडाका सहन न झाल्याने त्यांना अचानक चक्कर आली आणि ते थेट पेटलेल्या भाजावळीच्या ढिगावर कोसळले. त्यांचे कपडे जळालेल्या अवस्थेत कुटुंबीयांना आढळून आले. त्यांना तातडीने उपचारासाठी कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तेथील डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले.

खेड पोलिसांनी या प्रकरणी बी.एन.एस.एस. कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत. वाढत्या उन्हामुळे शेतकामावर जाणाऱ्या नागरिकांनी आपली काळजी घेण्याचे आवाहन यानिमित्ताने केले जात आहे. एका कष्टकरी वृद्धाचा अशा प्रकारे अंत झाल्याने निळीक गावावर शोककळा पसरली आहे.

Total Visitor Counter

3200793
Share This Article