GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांची निवड बिनविरोध; पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडून नव्या शिलेदारांना संधी

Gramin Varta
156 Views

रत्नागिरी: जिल्हा परिषदेच्या रिक्त असलेल्या उपाध्यक्ष आणि विविध विषय समिती सभापती पदांसाठीची निवडणूक प्रक्रिया बुधवारी अत्यंत उत्साहात पार पडली. शिवसेना मुख्यनेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार, शिवसेना उपनेते व पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी जाहीर केलेल्या नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आल्याने या सर्व निवडी बिनविरोध घोषित करण्यात आल्या. सामंत यांनी या निवडींमध्ये अनुभवाची सांगड घालत पूर्णपणे नवीन फळीला कारभारी म्हणून मैदानात उतरवले असून, आगामी सव्वा वर्षांच्या कालावधीसाठी या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे सभागृहात पार पडलेल्या या निवडणूक प्रक्रियेत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जीवन देसाई आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मानसिंग जाधव यांनी कामकाज पाहिले. विहित मुदतीत प्रत्येक पदासाठी केवळ एकच अर्ज दाखल झाल्याने ही प्रक्रिया बिनविरोध झाली. उपाध्यक्षपदी विराजमान झालेल्या विलास चाळके यांच्याकडे बांधकाम व आरोग्य या महत्त्वाच्या विभागांचा कार्यभार सोपवण्यात आला आहे. अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणुकांमध्ये पक्षाशी एकनिष्ठ राहिलेल्या कार्यकर्त्यांना या निवडीत प्राधान्य देण्यात आले आहे. यामध्ये गोळप गटातून ऐतिहासिक विजय मिळवणाऱ्या नंदकुमार मुरकर यांच्या निष्ठेचे चीज करत त्यांना अर्थ व शिक्षण सभापती पदाची महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच हातखंबा गटात पक्षाची जागा राखणाऱ्या ॲड. सुयोग कांबळे यांची समाजकल्याण सभापती पदी वर्णी लागली आहे.

या निवडींमध्ये प्रादेशिक समतोल साधण्यावरही विशेष भर देण्यात आला आहे. चिपळूण तालुक्याला प्रतिनिधित्व देताना सौ. मयुरी मिलिंद शिर्के यांची महिला व बालकल्याण सभापती पदी निवड करण्यात आली आहे, तर गुहागर तालुक्यातील महेश नाटेकर यांच्याकडे कृषी व पशुसंवर्धन सभापती पदाची सूत्रे सोपवण्यात आली आहेत. निवडीनंतर जिल्हा परिषद अध्यक्ष अस्मिता केंद्रे, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे आणि अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. याप्रसंगी माजी आमदार संजय कदम, सदानंद चव्हाण, जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, राहुल पंडित यांच्यासह अनेक पदाधिकारी व जिल्हा परिषद सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. नव्या दमाच्या या टीमच्या प्रशासकीय कौशल्याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Total Visitor Counter

3375616
Share This Article