रत्नागिरी: आधुनिक काळातील गुन्हेगारीचे स्वरूप बदलत असताना रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने तंत्रज्ञानाच्या मदतीने तपासात मोठी भरारी घेतली आहे. पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली विकसित करण्यात आलेले ‘RAIDS App’ (रत्नागिरी एआय इंटेलिजन्स डिटेक्शन सिस्टीम) सध्या गुन्हे तपासात मैलाचा दगड ठरत आहे. १५ डिसेंबर २०२५ रोजी कार्यान्वित झालेल्या या कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित (AI) प्रणालीमुळे केवळ रत्नागिरीच नव्हे, तर महाराष्ट्र पोलीस दलातील नागपूर, सातारा, पालघर आणि अहिल्यानगर यांसारख्या इतर जिल्ह्यांनाही गुंतागुंतीच्या प्रकरणांत मोलाची तांत्रिक मदत मिळत आहे.
या ॲपचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये १०८ वेगवेगळ्या अत्याधुनिक तांत्रिक पद्धतींचा वापर करून पाहिजे असलेल्या किंवा फरारी आरोपींचे, तसेच हरवलेल्या व्यक्तींचे फोटो पुनर्निर्मित (Reconstruct) केले जातात. यामुळे संशयितांची ओळख पटवणे आणि त्यांचा मागोवा घेणे पोलिसांना पूर्वीपेक्षा अधिक वेगाने आणि परिणामकारक रित्या शक्य झाले आहे. विशेषतः ज्या प्रकरणांमध्ये मृतदेहाचा चेहरा विद्रूप झालेला असतो किंवा ज्यांची ओळख पटवणे अत्यंत कठीण असते, अशा अज्ञात मृतदेहांच्या चेहऱ्याचे या तंत्रज्ञानाद्वारे हुबेहूब पुनर्निर्माण केले जात आहे. या प्रक्रियेमुळे अनेक क्लिष्ट प्रकरणांमध्ये मृतांची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले आहे.
रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने स्वबळावर विकसित केलेले हे तंत्रज्ञान रेखाचित्रांच्या पुनर्निर्माणासाठीही अत्यंत प्रभावी ठरत असून, राज्याच्या इतर पोलीस दलांसाठी हे एक मार्गदर्शक साधन बनले आहे. तंत्रज्ञानाचा हा प्रभावी वापर गुन्हेगारांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि हरवलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी पोलीस दलाची मोठी ताकद ठरत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.






