नागरिक संकटात असताना ठेकेदार कंपनीचे अधिकारी मात्र गाढ झोपेत
लांजा / वार्ताहर
रात्रभर कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे लांजा शहरातील मुंबई–गोवा महामार्गावरील श्रीराम पुलाजवळील वहाळ तुंबले आणि पहाटे सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास आसपासच्या भागातील अनेक घरांत पाणी शिरले. यामुळे त्या परिसरतील नागरिकांची प्रचंड धावपळ उडाली. एकूणच नागरिक संकटात असताना कंपनीचे अधिकारी मात्र गाढ झोपेत असल्याने संतापाचा भडका उडाला आहे.
सदर परिस्थितीत नागरिकांनी मदतीसाठी ठेकेदार कंपनीशी संपर्क साधला, मात्र बराच वेळ कंपनीतील जबाबदार व्यक्तींनी फोन उचलण्यास टाळाटाळ केल्याचे समजते. शेवटी तातडीने मदत म्हणून जेसीबी मशीन पाठवण्यात आले, परंतु तोपर्यंत स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते घटनास्थळी लोकांच्या मदतीसाठी गेले. काहीनी स्वतःच्या मालकीचे जेसीबी मशीन बोलावून वहाळ फोडण्याचे प्रयत्न केले.
यानंतर उशीरा ठेकेदार कंपनीची यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली. दरम्यान, ठेकेदार कंपनीच्या या निष्काळजीपणावर संतप्त नागरिकांनी तीव्र रोष व्यक्त केला आहे. नागरिक संकटात असताना कंपनीचे अधिकारी मात्र गाढ झोपेत होते, अशी टीका नागरिकांमधून होत आहे.
तर तब्बल तीन तासांनंतर पाणी ओसरू लागल्याने नागरिकांनी निश्वास टाकला. प्रशासनाने याप्रकरणी चौकशी करून जबाबदार ठेकेदार कंपनीवर योग्य कारवाई करावी अशी मागणी परिसरातील रहिवाशांकडून होत आहे.
लांजात श्रीराम पुलाजवळ वहाळ तुंबल्याने नागरिकांच्या घरात शिरले पाणी; ठेकेदार कंपनीवर संतापाचा भडका





