GRAMIN SEARCH BANNER

मद्यप्राशन नडले! खेडमध्ये मंदिरावरून खाली पडल्याने ४० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

Gramin Varta
124 Views

खेड : तालुक्यातील कळंबणी उपजिल्हा रुग्णालय परिसरात एका ४० वर्षीय व्यक्तीचा उंचावरून पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. किसन बाबु मालुसरे (वय ४०, रा. खारपेवाडी, ता. वेल्हा, जि. पुणे) असे मृत व्यक्तीचे नाव असून, याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत किसन मालुसरे हा आपल्या सहकाऱ्यांसोबत किल्ल्याच्या परिसरात कामासाठी आला होता. २५ मार्च रोजी सकाळच्या सुमारास त्यांच्या मांडीत दुखत असल्याने तो उपचारासाठी तळेगाव येथील दवाखान्यात गेला होता. दुपारी उपचार घेऊन परतल्यानंतर त्याने मद्यप्राशन केले होते. सायंकाळी जेवणाच्या वेळी त्याच्या सहकाऱ्यांनी त्याला वारंवार बोलावले, मात्र तो मंदिराच्या पाठीमागे बसून मद्यप्राशन करत होता. रात्रीच्या वेळी अचानक मोठा आवाज झाल्याने त्याचे सहकारी आणि सुपरवायझर घटनास्थळी धावले असता, किसन हा मंदिरावरून खाली असलेल्या दगडांवर आदळून पाण्यात पडल्याचे दिसून आले.

सहकाऱ्यांनी त्याला तत्काळ पाण्यातून बाहेर काढले, मात्र उंचावरून पडल्यामुळे त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन रक्तस्राव झाला होता. जखमी अवस्थेत त्याला तातडीने उपचारासाठी कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याची प्रकृती खालावली होती. येथील डॉक्टरांनी तपासणी अंती त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, अधिक तपास पोलीस करत आहेत.

Total Visitor Counter

3379197
Share This Article