दापोली: दापोली-खेड रस्त्यावरील वाकवली नजीक असलेल्या उन्हावरे फाट्याजवळ आज पहाटेच्या सुमारास एका दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात ३४ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, त्याचा मित्र गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे जालगाव आणि दापोली परिसरात मोठी शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवार दि. ३१ मार्च २०२६ रोजी पहाटे ३:०० वाजेच्या सुमारास नरेश चंद्रकांत रुके (वय ३४, रा. जालगाव बौद्धवाडी, ता. दापोली) आणि त्यांचा मित्र अमित अरुण माने (वय ३५, रा. काळकाई कोंड, ता. दापोली) हे दोघे चॉकलेट रंगाच्या अॅक्टिव्हा गाडीने (क्र. MH 08 BF 3766) प्रवास करत होते. उन्हवरे फाट्याजवळ आल्यावर चालकाचा ताबा सुटल्याने गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या गटारावर आदळून भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की, दुचाकीचा पुढचा आणि पाठीमागील भाग पूर्णपणे फुटलेल्या अवस्थेत आढळला. नरेश हा रात्री उशिरापर्यंत घरी न पोहोचल्याने त्याचे नातेवाईक नितेश तांबे यांनी पहाटे ५:०० च्या सुमारास त्याच्या मोबाईलवर फोन केला असता, घटनास्थळी असलेल्या पोलिसांनी फोन उचलून अपघाताची माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच नातेवाईक आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दोघांनाही ग्रामस्थांच्या मदतीने रुग्णवाहिकेतून उपजिल्हा रुग्णालय, दापोली येथे दाखल करण्यात आले. मात्र, तपासणीनंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी नरेश रुके याला पहाटे ५:०५ वाजता मृत घोषित केले. गंभीर जखमी असलेले अमित माने यांच्या डोक्याला मोठी दुखापत झाली असून, त्यांना पुढील उपचारासाठी तातडीने डेरवण येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या प्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, अधिक तपास पोलीस हवालदार बुरोंडकर करत आहेत.






