GRAMIN SEARCH BANNER

भाट्ये दर्गा वळणावर कार-दुचाकीचा भीषण अपघात; दुचाकीस्वार गंभीर जखमी

Gramin Varta
126 Views

रत्नागिरी: शहरालगतच्या भाट्ये दर्गा येथे रविवारी सकाळी कार आणि दुचाकीचा अपघात झाला. इंडिकेटर देऊन दुचाकी उजव्या बाजूला वळवत असताना पाठीमागून येणाऱ्या कारने जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीचालक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या अपघाताबाबत मिळालेली माहिती अशी की, गोळप सडा येथील रहिवासी इक्बाल हसन सोळकर (वय ६१) हे रविवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास आपल्या दुचाकीवरून (एमएच ०८, एम ६३७५) गोळप ते भाट्ये असे येत होते. भाट्ये दर्गा येथील वळणावर त्यांनी आपली दुचाकी उजव्या बाजूला वळवण्यासाठी इंडिकेटर दिला होता. त्याच वेळी रत्नागिरीहून गोळपच्या दिशेने जाणाऱ्या कारने (एमएच ०१, ईएम ६५२४) त्यांच्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की इक्बाल सोळकर रस्त्यावर फेकले गेल्याने जखमी झाले.

अपघातानंतर स्थानिकांनी तातडीने धाव घेत जखमी सोळकर यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. इक्बाल सोळकर हे मूळचे नवानगर भाट्ये येथील रहिवासी आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून जिल्हा रुग्णालयाच्या पोलीस चौकीत या अपघाताची नोंद करण्यात आली आहे. भरधाव कारच्या धडकेमुळे दुचाकीचेही मोठे नुकसान झाले असून, वळणावर वाहने चालवताना अधिक खबरदारी घेण्याची गरज व्यक्त होत आहे.

Total Visitor Counter

3258711
Share This Article