GRAMIN SEARCH BANNER

राजापूर शहर पाणीपुरवठा योजनेतील कोंदवली येथील कामाचा मार्ग मोकळा; आमदार किरण सामंत यांनी काढला तोडगा

राजापूर: राजापूर शहर पाणीपुरवठा योजनेअंतर्गत कोंदवली येथे गुरुत्ववाहिनी अंथरण्याच्या कामात निर्माण झालेला पेच अखेर आमदार किरण सामंत यांच्या मध्यस्थीने सुटला आहे. या संदर्भात आयोजित विशेष आढावा बैठकीत आमदार सामंत यांनी प्रशासन आणि ठेकेदारांना स्थानिक ग्रामस्थांना विश्वासात घेऊनच काम करण्याचे कडक निर्देश दिले. या हस्तक्षेपामुळे गेल्या काही दिवसांपासून रखडलेल्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पातील अडथळे दूर झाले असून, लवकरच कामाला गती मिळणार आहे.

राजापूर शहराच्या भविष्यातील पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या योजनेत गुरुत्ववाहिनी टाकताना स्थानिक पातळीवर काही तांत्रिक व सामाजिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. यामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजीचे वातावरण होते आणि कामाची गती मंदावली होती. ही बाब लक्षात घेता आमदार किरण सामंत यांनी तहसीलदार, मुख्याधिकारी, गटविकास अधिकारी आणि स्थानिक ग्रामस्थांची संयुक्त बैठक घेऊन सविस्तर चर्चा केली. बैठकीत ग्रामस्थांनी आपल्या शंका आणि अडचणी मांडल्या, त्यावर सकारात्मक चर्चा करून आमदारांनी प्रशासनाला कामाचे नियोजन करण्याच्या सूचना दिल्या.

कोणताही विकास प्रकल्प राबवताना लोकसहभाग आणि ग्रामस्थांचा विश्वास महत्त्वाचा असतो, असे स्पष्ट करत आमदार सामंत यांनी ठेकेदाराला कामात पारदर्शकता ठेवण्याचे आदेश दिले. तसेच हा प्रकल्प राजापूरकरांच्या जिव्हाळ्याचा असल्याने कामात कोणताही विलंब सहन केला जाणार नाही, असा इशाराही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिला. यावेळी तहसीलदार विकास गमरे, सभापती नंदनी कदम, उपसभापती अभिजीत गुरव, मुख्याधिकारी अभिजीत कुंभार, गटविकास अधिकारी संतोष म्हेत्रे यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी आणि कोदवलीचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमदारांच्या या पुढाकारामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले असून प्रशासनाला सहकार्य करण्याची भूमिका घेतली आहे.

Total Visitor Counter

3486645
Share This Article