युवा पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य; दौऱ्याची जय्यत तयारी
चिपळूण : भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक शुक्रवार (ता. २४) आणि शनिवारी (ता. २५) चिपळूण आणि रत्नागिरीच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यामुळे भाजपच्या युवा पदाधिकाऱ्यांमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. भाजपचे रत्नागिरी दक्षिण जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदेशाध्यक्ष श्री. महाडिक यांच्या स्वागतासह इतर कार्यक्रमांची जय्यत तयारी करण्यात आली असून, या दौऱ्यामुळे युवा कार्यकर्त्यांना निश्चितच बळ मिळेल, असा विश्वास युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राहुल पवार यांनी व्यक्त केला.
कृष्णराज महाडिक हे गुहागर येथून दुपारी १२.०० वा. कारने चिपळुणात येतील. यावेळी उक्ताड येथे त्यांचे जोरदार स्वागत केले जाणार आहे. दुपारी ०१.०० वा. इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राजवळ छत्रपती शिवाजी महारांच्या पुतळ्याला श्री. महाडिक पुष्पहार अर्पण करतील. तेथून बहादूरशेखनाका येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून पिंपळी खुर्द येथे वाशिष्ठी मिल्क अॅण्ड मिल्क प्रॉडक्ट्स या दुग्धप्रकल्पाला सदिच्छा भेट देतील. येथे श्री. महाडिक वाशिष्ठी डेअरीची पाहणी करून तेथील सभागृहात भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधतील. त्यानंतर दुपारी ०४.०० वा. श्री. महाडिक यांच्या उपस्थितीत शिक्षक पतपेढी सभागृह, चिपळूण येथे विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. तसेच कंटेट क्रिएटर्स, फॉ़लोअर्स आणि इन्फ्लूएन्सर्स यांची भेट घेऊन ते संवाद साधणार आहेत. त्यानंतर युवा मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची सभा होईल. या सभेला श्री. महाडिक मार्गदर्शन करणार आहेत.
त्यानंतर सायंकाळी ०६.०० वा. संगमेश्वरच्या दिशेने प्रयाण करतील. सायंकाळी ०७.०० वा. कसबा येथे संभाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून सरदेसाई वाड्याला भेट देतील. त्यानंतर रात्री ८.३० वा. श्री. महाडिक यांचे हॉटेल आमंत्रण येथे आगमन होईल. तेथे भोजन झाल्यानंतर रात्री ०९.३० वा. शासकीय विश्रामगृह येथे त्यांचे आगमन होईल. ही वेळ राखीव असणार आहे. दि. २५ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १०.०० वा. श्री. कृष्णराज महाडिक रत्नागिरी येथील भाजपच्या जिल्हा कार्यालयाला भेट देतील. येथे युवा मोर्चाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी ते संवाद साधतील. सकाळी ११.०० वा. रत्नागिरी येथील पतितपावन मंदिराला श्री. महाडिक भेट देऊन लक्ष्मी-नारायणाचे दर्शन घेतील. त्यानंतर सकाळी ११.३० वा. ते कारने देवगडकडे प्रयाण करतील, अशी माहिती युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राहुल पवार यांनी दिली.
कृष्णराज महाडिक यांच्या चिपळूण आणि रत्नागिरी येथील दौऱ्यात आजी-माजी पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन राहुल पवार यांनी केले आहे.





