GRAMIN SEARCH BANNER

यंदा रत्नागिरी पोलीस भरतीमध्ये पंचेचाळीस टक्के स्थानिक तरुणांची भरती

रत्नागिरी: जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई आणि चालक पदांच्या भरतीचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, या प्रक्रियेत रत्नागिरी जिल्ह्यातील उमेदवारांनी ऐतिहासिक कामगिरी केली आहे. एकूण एकशे आठ पदांसाठी झालेल्या या भरतीमध्ये पहिल्यांदाच पंचेचाळीस टक्के स्थानिक तरुण-तरुणींनी पोलीस दलात प्रवेश मिळवत जिल्ह्याचा दबदबा निर्माण केला आहे. पोलीस अधीक्षक कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या तात्पुरत्या निवड यादीनुसार, स्थानिक भूमिपुत्रांच्या या यशामुळे जिल्हा पोलीस दलाला आता स्थानिक भौगोलिक परिस्थिती आणि भाषेची उत्तम जाण असलेले मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे.

जिल्हा पोलीस दलात रिक्त असलेल्या शंभर पोलीस शिपाई आणि आठ चालक पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती. पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत पारदर्शकपणे पार पडलेल्या या निवड प्रक्रियेत स्थानिक उमेदवारांनी मैदानी आणि लेखी अशा दोन्ही परीक्षांत उत्तम गुणांची कमाई केली.

अनेक मुला-मुलींनी घरच्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करत हे यश मिळवले आहे. विशेषतः मुलींनीही या भरतीत आपले कर्तृत्व सिद्ध करत मोठ्या प्रमाणावर यश संपादन केले आहे. स्थानिक तरुणांच्या या मोठ्या सहभागामुळे आणि यशामुळे जिल्ह्याभरात आनंदाचे वातावरण असून, भविष्यात गुन्हेगारी नियंत्रण आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी या स्थानिक पोलिसांची मोठी मदत होणार आहे.

Total Visitor Counter

3487278
Share This Article