GRAMIN SEARCH BANNER

थिबा पॉईंट परिसरात जुन्या वादातून तरुणावर हल्ला; तिघांविरोधात गुन्हा दाखल

Gramin Varta
369 Views

रत्नागिरी : शहरातील थिबा पॉईंट परिसरात जुन्या वादाच्या पार्श्वभूमीवर एका तरुणावर तिघांनी मिळून हल्ला केल्याची घटना ३ मे रोजी सायंकाळी घडली असून, या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आदित्य भिमराव कांबळे (वय १९, रा. पाडावेवाडी, मिरजोळे) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ते व त्यांचे सहकारी मोटारसायकलवर थिबा पॉईंट येथील जिल्हाधिकारी निवासस्थानासमोरील पार्किंग परिसरात थांबले असताना आरोपी करण सज्जन लाड, मार्विक नारकर व वेदांत सावंत हे तेथे आले. चार महिन्यांपूर्वी झालेल्या भांडणाचा मुद्दा काढत आरोपींनी तक्रारदाराशी वाद घातला आणि त्यानंतर तिघांनी मिळून तक्रारदारास हाताच्या थपडा व ठोशांनी गाल व नाकावर मारहाण केली. तसेच आरोपी करण लाड याने लाकडी दांड्याने तक्रारदाराच्या डाव्या पायावर मारहाण केल्याचा आरोप आहे.

या हल्ल्यात आदित्य कांबळे जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तसेच आरोपींनी तक्रारदाराला शिवीगाळ करत दमदाटी केल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा क्रमांक १४२/२०२६ दाखल करण्यात आला असून, पुढील तपास रत्नागिरी शहर पोलिसांकडून सुरू आहे.

Total Visitor Counter

3357084
Share This Article