GRAMIN SEARCH BANNER

चिपळूणमधील सती नाका येथे रेफ्रिजिरेशनचे दुकान फोडले; लाखाचा मुद्देमाल लंपास

Gramin Varta
58 Views

चिपळूण :  तालुक्यातील सती नाका परिसरात असलेल्या श्री सुकाई रेफ्रिजिरेशन या दुकानात अज्ञात चोरट्यांनी खिडकी तोडून घरफोडी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घरफोडीमध्ये चोरट्यांनी दुकानातील एकूण १ लाख ४ हजार ५०० रुपये किमतीचे तांत्रिक साहित्य आणि तांब्याचे पाईप चोरून नेले असून याप्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रदीप काशिनाथ कदम (वय ४५, रा. वेहळे कदमवाडी) यांचे सती नाका येथे श्री सुकाई रेफ्रिजिरेशन नावाचे दुकान आहे. ३ मे रोजी सकाळी ८ वाजेपासून ते ४ मे रोजी सकाळी ९ वाजेपर्यंतच्या दरम्यान, अज्ञात चोरट्याने दुकानाच्या खिडकीचे गज तोडून आत प्रवेश केला.

चोरट्यांनी दुकानातील १७ हजार रुपये किमतीचा इमशियन कंपनीचा कॉम्प्रेसर, २५ हजार रुपयांचे एसी आणि फ्रिज सर्व्हिसिंगचे टूलकिट, डीप फ्रिजची कुलिंग क्वाईल, ब्लोवर, सर्व्हिस पंप, वॉशिंग पाईप आणि ड्रिल मशीन यासह सुमारे ३० हजार रुपये किमतीचे रेफ्रिजरेटचे तांब्याचे पाईपचे तुकडे असा एकूण १ लाख ४ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. या चोरीच्या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून फिर्यादी यांनी चिपळूण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी या तक्रारीवरून अज्ञात आरोपी विरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३३१(२), ३३१(४) आणि ३०५ प्रमाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक १३०/२०२६ अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या चोरीच्या तपासासाठी पोलिसांनी ‘ई-साक्ष’ ॲपचा वापर केला असून पोलीस अज्ञात आरोपीचा शोध घेत आहेत. भरवस्तीत असलेल्या दुकानामध्ये अशा प्रकारे खिडकी तोडून घरफोडी झाल्याने व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Total Visitor Counter

3360765
Share This Article