GRAMIN SEARCH BANNER

राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत रत्नागिरीच्या स्वरा साखळकरची सुवर्ण झेप; दोन सुवर्ण आणि एका रौप्यपदकावर कोरले नाव

Gramin Varta
52 Views

रत्नागिरी: मुंबई विरार येथे नुकत्याच पार पडलेल्या ‘व्हिक्टरी क्लब ६ व्या महाराष्ट्र ओपन स्टेट तायक्वॉंदो चॅम्पियनशिप २०२६’ या भव्य राज्यस्तरीय स्पर्धेत रत्नागिरीच्या सुवर्णकन्येने आपल्या उज्वल यशाची परंपरा कायम ठेवली आहे. रत्नागिरी येथील ‘एस आर के तायक्वॉंदो अकॅडमी’ची खेळाडू स्वरा साक्षी विकास साखळकर हिने या स्पर्धेत दोन सुवर्ण आणि एका कांस्यपदकाची कमाई करत जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

तायक्वांडो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्या मान्यतेने आणि सहकार्याने २८ आणि २९ एप्रिल रोजी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या स्पर्धेत स्वराने सर्वप्रथम कॅडेट गटातील ४४ किलो खालील वजनी गटात अप्रतिम कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले आणि आपल्या पदकांचे खाते उघडले. या यशानंतरही तिचा विजयरथ थांबला नाही. तिने ज्युनियर गटातील ४४ किलो वजनी गटातही आपल्या कौशल्याची चुणूक दाखवत आणखी एका सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. या दोन्ही सुवर्णपदकांसोबतच स्वराने वैयक्तिक ‘पुमसे’ प्रकारातही चमकदार कामगिरी करत कांस्यपदक मिळवले. अशाप्रकारे या राज्यस्तरीय स्पर्धेत दोन सुवर्ण आणि एक कांस्य अशा एकूण तीन पदकांची कमाई करून तिने रत्नागिरीचे नाव क्रीडा जगतात उज्ज्वल केले.

अभूतपूर्व कामगिरी करणारी ही सुवर्णकन्या रत्नागिरी नगरपरिषद शाळा क्रमांक १५ ची विद्यार्थिनी असून ती इयत्ता सातवीमध्ये शिकत आहे. स्वराला या स्पर्धेसाठी राष्ट्रीय प्रशिक्षक व पंच शाहरुख शेख सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तिच्या या यशाबद्दल तायक्वांडो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ. अविनाश बारगजे, महासचिव मिलिंद पठारे, खजिनदार व्यंकटेश्वर कररा, सचिव सुभाष पाटील, उपाध्यक्ष व शिवछत्रपती पुरस्कार विजेते प्रवीण बोरसे, सदस्य अजित गार्गे, नीरज बोरसे आणि सतीश खेमसकर यांनी कौतुक केले आहे.

तसेच जिल्हा उपाध्यक्ष शैलेश गायकवाड, विश्वदास लोखंडे, सचिव लक्ष्मण कररा, कोषाध्यक्ष शशांक घडशी, क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्राप्त तायक्वांदो प्रशिक्षक प्रशांत मकवाना आणि मिलिंद भागवत यांनीही स्वराचे विशेष अभिनंदन केले. या दैदिप्यमान यशानंतर ‘एस आर के क्लब’चे अध्यक्ष अमोल सावंत, उपाध्यक्ष वीरेश मयेकर, सचिव शीतल खामकर, कोषाध्यक्ष अंजली सावंत, सदस्य निखिल सावंत, प्रफुल्ल हतिसकर यांच्यासह शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक वर्ग आणि समस्त पालक वर्गाकडून स्वरावर कौतुकाचा वर्षाव होत असून तिच्या पुढील क्रीडा प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.

Total Visitor Counter

3389254
Share This Article