GRAMIN SEARCH BANNER

होर्मुज सामुद्रधुनीवर इराणचा यू-टर्न; टोल नाही पण पर्यावरण कर आकारणार

Gramin Varta
7 Views

तेहरान: अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या तणाव आणि संभाव्य करारासंदर्भातील चर्चांच्या पार्श्वभूमीवर इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बाघेई यांनी मोठे वक्तव्य केले आहे.

सोमवारी (२५ मे) पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, होर्मुज सामुद्रधुनीचे व्यवस्थापन हे किनारी देशांच्या अधिकारक्षेत्रात येते. येथे इराण कोणताही टोल वसूल करणार नाही, मात्र पुरवल्या जाणाऱ्या सेवांसाठी शुल्क आकारले जाईल. यापूर्वी इराणने एका प्राधिकरणाची स्थापना करून विविध जहाजांकडून टोल आकारण्याची घोषणा केली होती.

इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने जहाजांवर पर्यावरण कर (एन्व्हायर्नमेंट टॅक्स) लागू करण्याची पुष्टी करताना म्हटले, “हा कोणताही टोल नाही. लोकांनी योग्य शब्दावली वापरावी. इराण आणि ओमान सध्या एक नवीन प्रोटोकॉल तयार करत आहेत. या नव्या व्यवस्थेनुसार होर्मुज सामुद्रधुनी, फारसचा आखात आणि ओमान समुद्राच्या पर्यावरण संरक्षणासाठी समुद्री सेवा पुरवल्या जातील, ज्यासाठी पर्यावरण कर आकारणे आवश्यक आहे. या विषयावर ओमानसोबत लवकरच अंतिम करार होईल, अशी आम्हाला अपेक्षा आहे.”

इराणी प्रवक्त्यांनी पुढे म्हटले, “होर्मुजची सुरक्षा ही संपूर्ण जगासाठी चिंतेचा विषय आहे. मात्र आम्हालाही आमच्या सुरक्षेची काळजी घ्यावी लागते आणि आंतरराष्ट्रीय समुदायाच्या चिंतांकडेही लक्ष द्यावे लागते. इराण आणि ओमान होर्मुज सामुद्रधुनीचा वापर मुक्त व्यापार आणि सुरक्षित वाहतुकीसाठी करू इच्छितात.” ते पुढे म्हणाले, “या सामुद्रधुनीचा वापर इराणविरोधी लष्करी आक्रमणासाठी करण्यात आला होता. उपपरराष्ट्र मंत्र्यांचा ओमान दौरा हा होर्मुज सामुद्रधुनीत सुरक्षित वाहतुकीसाठी एक यंत्रणा उभारण्याविषयी सल्लामसलत करण्यासाठी आहे. प्रत्येक जबाबदार देश या व्यवस्थेचे स्वागत करेल.”

इस्माईल बाघेई म्हणाले, “सुरक्षा आणि राष्ट्रीय हितांचे रक्षण करण्यासाठी आम्ही सामुद्रधुनीलगतच्या देशांशी संपर्कात आहोत.” संभाव्य कराराबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, अमेरिकेच्या आश्वासनांवर “कोणतीही हमी नाही” आणि इराणला कोणत्याही “धमक्यांची पर्वा नाही.”ते म्हणाले की, या चर्चेत पाकिस्तानव्यतिरिक्त इतर देशांचाही मध्यस्थ म्हणून सहभाग वाढला आहे. तसेच लेबनॉनमधील संघर्ष संपवण्यासंबंधीचे एक कलमही चर्चेत समाविष्ट करण्यात आले आहे.

इराणी प्रवक्त्यांनी हेही स्पष्ट केले की, सध्या अमेरिका-इराण करारामध्ये अणु विषयावर चर्चा सुरू नाही आणि भर हा “संघर्ष समाप्त करण्यावर” आहे. तसेच इस्रायल या चर्चेला कमकुवत करण्याचा प्रयत्न करू शकतो, अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली.बाघेई यांनी हे वक्तव्य अशा वेळी केले आहे, जेव्हा भारत दौऱ्यावर आलेले अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ यांनी सोमवारी सांगितले की, इराणसोबत सुरू असलेल्या चर्चांबाबत आज मोठी घडामोड समोर येऊ शकते.

मार्को रुबिओ यांच्या मते, रविवारी दोन्ही देशांमध्ये करार होऊ शकला नाही, मात्र ही फार मोठी बाब मानण्याची गरज नाही. त्यांनी सांगितले की, अमेरिकेने इराणसमोर एक ठोस प्रस्ताव ठेवला आहे. या प्रस्तावात होर्मुज सामुद्रधुनी खुली ठेवणे आणि इराणच्या अणु कार्यक्रमावर ठरावीक कालावधीत गंभीर चर्चा करण्याचा समावेश आहे.

Total Visitor Counter

3417057
Share This Article