अपघाताची भीती असूनही ग्रामपंचायत व जिल्हा परिषद प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष
राजापूर : तालुक्यातील आंगले ग्रामपंचायत अंतर्गत गावातील मुख्य रस्त्यावर असलेल्या राऊतवाडी येथील ओढ्यावरील मोरीला गेल्या अनेक महिन्यांपासून मोठे भगदाड (होल) पडले आहे. या रस्त्यावरून सतत वाहनांची वर्दळ सुरू असल्याने येथे कधीही मोठा आणि जीवघेणा अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. असे असतानाही रात्रीच्या वेळी किंवा दिवसा, गावातील सत्ता उपभोगणाऱ्या सत्ताधाऱ्यांचे अथवा ग्रामस्थांचे या गंभीर समस्येकडे अजिबात लक्ष नसल्याचे चित्र आहे.
प्रशासनाच्या या प्रचंड अनास्थेमुळे आज आंगले गावातील मुख्य रस्त्याची दुरवस्था झाली असून रस्त्याचे अक्षरशः चाळण झाली आहे. जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या या रस्त्याकडे संबंधित विभागाचे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आंगले गावातील सामाजिक कार्यकर्ते विलास राऊत यांनी केला आहे. गावातील ही अत्यंत महत्त्वाची आणि धोकादायक समस्या लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत, परंतु प्रशासकीय पातळीवरून ढिम्म हालचालींमुळे या प्रयत्नांना अद्याप यश येताना दिसत नसल्याची खंतही सामाजिक कार्यकर्ते विलास राऊत यांनी बोलून दाखवली आहे. या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या व ग्रामस्थांच्या सुरक्षेसाठी जिल्हा परिषद बांधकाम विभागाने व स्थानिक प्रशासनाने तात्काळ या मोरीची दुरुस्ती करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.







