GRAMIN SEARCH BANNER

झाडगावमध्ये घरातील फ्रिजच्या कॉम्प्रेसरला आग; प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली

Gramin Varta
322 Views

रत्नागिरी /प्रतिनिधी : शहरातील झाडगाव परिसरातील घराला सोमवार रात्री आठ वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागल्याने एकच खळबळ उडाली. फ्रिजच्या कॉम्प्रेसरमध्ये बिघाड होऊन लागलेल्या आगीमुळे घरातील साहित्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. मात्र, नागरिकांच्या तत्परतेमुळे आणि अग्निशमन दलाच्या वेळीच झालेल्या हस्तक्षेपामुळे मोठी दुर्घटना टळली.

मिळालेल्या माहितीनुसार, घरातील फ्रिजच्या कॉम्प्रेसरला अचानक आग लागली. काही क्षणांतच घरभर धुराचे लोट पसरल्याने घरातील सदस्य भयभीत झाले. त्यांनी तातडीने घराबाहेर धाव घेत आरडाओरडा करून मदतीसाठी हाक मारली. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले.

दरम्यान, आगीची तीव्रता वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन नागरिकांनी प्रसंगावधान दाखवत फ्रिजच्या जवळ असलेला गॅस सिलेंडर सुरक्षितरित्या घराबाहेर काढला. त्यामुळे संभाव्य स्फोटाचा धोका टळून मोठी जीवितहानी होण्यापासून बचाव झाला. या घटनेची माहिती मिळताच नगर परिषदेच्या अग्निशमन विभागाला तातडीने पाचारण करण्यात आले. तसेच शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विवेक पाटील यांना माहिती मिळताच त्यांनी तत्काळ पोलिस पथक घटनास्थळी रवाना केले. अग्निशमन दलाचे जवान काही वेळातच घटनास्थळी दाखल झाले आणि धुराने व्यापलेल्या भागावर पाण्याचा मारा करून परिस्थिती नियंत्रणात आणली.

या आगीत घरातील काही विद्युत उपकरणे, फर्निचर व अन्य साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून नागरिकांच्या सतर्कतेमुळे संभाव्य अनर्थ टळल्याची भावना परिसरातून व्यक्त होत आहे. घटनेनंतर परिसरात काही काळ चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र अग्निशमन दल, पोलिस प्रशासन आणि स्थानिक नागरिक यांच्या समन्वित प्रयत्नांमुळे परिस्थिती लवकरच सुरळीत करण्यात यश आले.

Total Visitor Counter

3487404
Share This Article