GRAMIN SEARCH BANNER

चिपळूण नागरी सहकारी पतसंस्था आयोजित चिपळूण नागरी प्रीमियर लीगचा जल्लोषात समारोप

Gramin Varta
3 Views

चिपळूण : चिपळूण नागरी सहकारी पतसंस्था आयोजित चिपळूण नागरी प्रीमियर लीग २०२६ भव्य नाईट क्रिकेट स्पर्धा ३० एप्रिल व १ मे या कालावधीत मोठ्या उत्साहात आणि जल्लोषमय वातावरणात पार पडली. पतसंस्थेच्या ५० शाखांमधील कर्मचाऱ्यांसाठी खासकरून आयोजित केलेल्या या स्पर्धेमुळे पतसंस्थेतील कर्मचाऱ्यांमधील एकोपा, सांघिक भावना आणि क्रीडाभावना वृद्धिंगत होताना पाहायला मिळाली. या स्पर्धेच्या अ गटात रत्नसिंधू इलेव्हन दक्षिण विभाग या संघाने विजेतेपद पटकावले, तर इलेव्हन फायटर पश्चिम या गटविजेत्या संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. स्पर्धेच्या ब गटात सलग तीन वर्षे विजेत्या राहिलेल्या वाशिष्ठी डेअरीच्या वाशिष्ठी इलेव्हन या संघावर चिपळूण सनराईझर्सने मात करून विजेतेपद पटकावले.

30 एप्रिल रोजी सायंकाळी या स्पर्धेचे मोठ्या दिमाखात उद्घाटन झाले. तर 1 मे रोजी रात्री शानदार पारितोषिक वितरण समारंभ पाडल्यानंतर स्पर्धेचा समारोप झाला. स्पर्धेच्या उद्घाटन आणि पारितोषिक वितरण समारंभाला नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक-अध्यक्ष सुभाषराव चव्हाण, ज्येष्ठ संचालिका सौ. स्मिताताई चव्हाण, भाजपचे रत्नागिरी दक्षिण जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव, चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक सत्यवान महामुनकर, सोमा गुडेकर, मनोहर मोहिते, गुलाब सुर्वे,रविंद्र भोसले, प्रकाश साळवी, प्रमोद साळवी, प्रकाश पत्की, राजेश वाजे, तज्ज्ञ संचालिका अॅड सौ. नयना पवार, तज्ज्ञ संचालक राजेंद्र पटवर्धन, चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच वाशिष्ठी डेअरीच्या मुख्य प्रवर्तक सौ. स्वप्ना यादव, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष बळीराम मोरे, सरचिटणीस स्वानंद रानडे, चिपळूण शहर मंडल अध्यक्ष शशिकांत मोदी, शहर सरचिटणीस सारिका भावे, नगरसेविका व भाजपच्या ओबीसी महिला जिल्हाध्यक्ष व नगरसेविका वैशाली निमकर, शिवसेनेच्या नगरसेविका राणी महाडिक, नगरसेविका शीतल रानडे, नगरसेविका अंजली कदम, भाजपचे जिल्हा चिटणीस योगेश शिर्के, कुणाल आंबेकर, संदेश ओक, शक्तीकुमार चव्हाण, रुही खेडेकर, डॉ. स्वामिनी यादव यांच्यासह चिपळूण नागरी पतसंस्थेचे अधिकारी व कर्मचारी, भाजपचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच चिपळूण नागरी पतसंस्थेचे हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्पर्धेचा अ गटातील अंतिम सामन्यात रत्नसिंधू इलेव्हन दक्षिण विभाग आणि इलेव्हन फायटर पश्चिम विभाग यांच्यात अत्यंत चुरशीची लढत झाली. यात रत्नसिंधू इलेव्हन संघाने इलेव्हन फायटर संघावर ९ गडी राखून मात केली. इलेव्हन फायटर संघाने प्रथम फलंदाजी करताना सहा षटकात ९ गड्यांच्या मोबदल्यात ४६ धावा केल्या. रत्नसिंधू इलेव्हनच्या प्रितेश महाडिकने चार गडी बाद करून इलेव्हन फायटरचा स्कोअर बोर्ड रोखून धरला होता. ४७ धावांचा पाठलाग करताना रत्नसिंधूच्या फलंदाजांनी दमदार सुरुवात केली. अवघा एक गडी गमावून रत्नसिंधू इलेव्हनने इलेव्हन फायटरला पराभवाला धूळ चारली.

स्पर्धेच्या ब गटातील वाशिष्ठी डेअरीच्या वाशिष्ठी इलेव्हन आणि चिपळूण सनराईझर्स यांच्यातील अंतिम सामनाही उत्कंठावर्धक ठरला. वाशिष्ठी इलेव्हन संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र पहिल्याच षटकात चिपळूण रायझर्सच्या गुलजार गोलंदाजने वाशिष्ठी इलेव्हनचे तीन गडी बाद केले. त्यानंतर आलेल्या एकाही फलंदाजांना दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. वाशिष्ठी इलेव्हनने सहा षटकात ४४ धावा जमविल्या. ४५ धावांचा पाठलाग करताना चिपळूण सनराईझर्सने सुरुवातीपासूनच आक्रमक फलंदाजी केली आणि ६ गाडी राखून सलग तीन वर्षे विजेता ठरलेल्या वाशिष्ठी इलेव्हन संघावर मात करून विजेतेपद पटकाविले.

दोन दिवस चाललेल्या या स्पर्धेत चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या ५० विविध शाखांतील खेळाडूंनी उत्साहाने सहभाग घेत उत्कंठावर्धक सामने साकारले. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडलेल्या या नाईट क्रिकेटमुळे खेळाडूंमध्ये विशेष ऊर्जा आणि प्रेक्षकांमध्ये वेगळेच आकर्षण पाहायला मिळाले. या उपक्रमामुळे पतसंस्थेच्या कर्मचाऱ्यांमध्ये परस्पर सुसंवाद वाढण्यासोबतच आरोग्यदायी स्पर्धेची भावना दृढ झाली असून, अशा उपक्रमांमुळे संस्थेची कार्यसंस्कृती अधिक मजबूत होत असल्याचे यावेळी अधोरेखित झाले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेणारे तसेच स्पर्धेला सहकार्य करणाऱ्या सर्वांचे सौ. स्वप्ना यादव यांनी आभार मानले.

Total Visitor Counter

3350456
Share This Article