GRAMIN SEARCH BANNER

दापोली : गिम्हवणे येथे बंद घर फोडून पावणेपाच लाखांचा ऐवज लंपास

दापोली : तालुक्यातील गिम्हवणे येथील निसर्ग रेसीडेन्सीमध्ये भरवस्तीत घरफोडीची एक मोठी घटना उघडकीस आली असून, अज्ञात चोरट्यांनी घराचा कडी-कोयंडा तोडून सुमारे ४ लाख ८५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि रोकड लंपास केली आहे. याप्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गिम्हवणे भैरी मंदिर परिसरातील निसर्ग रेसीडेन्सीमधील रूम नंबर २०३ मध्ये राहणारे फिर्यादी कमलाकर शांताराम मिरजळकर (वय ४७) हे १० एप्रिल ते १२ एप्रिल या कालावधीत घर बंद करून बाहेर गेले होते. हीच संधी साधून अज्ञात चोरट्याने १० एप्रिल रोजी रात्री ९.३० ते १२ एप्रिल रोजी दुपारी २ वाजेच्या दरम्यान मिरजळकर यांच्या घराला लक्ष्य केले. चोरट्याने घराच्या मुख्य दरवाजाचा कोयडा कोणत्यातरी कठीण साधनाने तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर बेडरुममधील दोन लोखंडी कपाटांचे दरवाजे उचकटून लॉकरमध्ये ठेवलेले साडेपाच तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, ५ ग्रॅम वजनाचे मणीमंगळसूत्र, ३ ग्रॅमच्या दोन सोन्याच्या कुड्या, ३ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी आणि १५ हजार रुपयांची रोकड असा एकूण ४ लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.
या घटनेची माहिती फिर्यादी मिरजळकर यांनी दापोली पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. याप्रकरणी भारतीय दंड संहिता कलम ३०५(अ), ३३१(३) आणि ३३१(४) अन्वये गुन्हा रजिस्टर नंबर ६६/२०२६ नुसार नोंदवण्यात आला असून, पोलीस अज्ञात चोरट्याचा शोध घेत आहेत. भरवस्तीत झालेल्या या धाडसी चोरीमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून पोलिसांनी गस्त वाढवण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. पोलीस उपनिरीक्षक स्तरावरील अधिकारी या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Total Visitor Counter

3307955
Share This Article