संगमेश्वर/ सिकंदर फरास: संगमेश्वर तालुक्यात भारत संचार निगम लिमिटेडच्या ढिसाळ कारभाराचा फटका नागरिकांना बसत आहे. कोंडगाव आणि साखरपा या महत्त्वाच्या परिसरामध्ये गेले तब्बल आठ दिवस बीएसएनएलची इंटरनेट सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. या अनपेक्षित खंडामुळे शालेय विद्यार्थ्यांपासून ते उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत आणि ऑनलाईन कामे करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.
मागील आठ दिवसांपासून कोंडगाव बाजारपेठ आणि साखरपा या प्रमुख ठिकाणी इंटरनेट सेवा नसल्याने येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. विशेषतः सध्या ऑनलाईन शिक्षणाचा काळ असल्याने उच्चशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. अभ्यासक्रम, ऑनलाईन परीक्षा फॉर्म भरणे किंवा इतर महत्त्वाच्या शासकीय कामांसाठी इंटरनेट आवश्यक असताना, सेवा नसल्याने त्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे.
आश्चर्याची बाब म्हणजे, या परिसरापासून अवघ्या चार किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या मुर्शी, भोवडे आणि दाभोळे या गावांमध्ये बीएसएनएलची इंटरनेट सेवा सुरळीत सुरू आहे. मात्र, कोंडगाव बाजारपेठ आणि साखरपा या मोठ्या वस्तीच्या ठिकाणीच सेवा बंद असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. बीएसएनएलच्या संबंधित खात्याने या गंभीर समस्येकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत. तातडीने ही सेवा पूर्ववत करून विद्यार्थ्यांचे आणि नागरिकांचे होणारे नुकसान थांबवावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.







