GRAMIN SEARCH BANNER

चिपळूण: सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात बुद्धपौर्णिमेला रंगणार प्राणी प्रगणना; निसर्गप्रेमींना मिळणार वन्यजीवांच्या दर्शनाची संधी

चिपळूण: सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या घनदाट जंगलात येत्या १ आणि २ मे रोजी बुद्धपौर्णिमेच्या लख्ख प्रकाशात वन्यप्राण्यांची गणना केली जाणार असून, या अनोख्या अनुभवाचा भाग होण्यासाठी निसर्गप्रेमींना प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे. रात्रीची गूढ शांतता आणि वन्यप्राण्यांच्या आवाजाच्या पार्श्वभूमीवर पाणवठ्यांवर तहान भागवण्यासाठी येणाऱ्या तृणभक्षी व हिंस्र प्राण्यांचे दर्शन घेण्याची संधी यानिमित्ताने उपलब्ध होणार आहे. या उपक्रमाद्वारे व्याघ्र प्रकल्पातील वन्यप्राण्यांचे अस्तित्व, त्यांच्या संख्येतील बदल आणि विलुप्त होणाऱ्या प्रजातींची महत्त्वाची नोंद घेतली जाणार असून, वाघांच्या संख्येचा अंदाज घेण्यासाठी ही प्रगणना अत्यंत मोलाची ठरणार आहे.

प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांच्या निर्देशानुसार या विशेष मोहिमेसाठी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात जय्यत तयारी करण्यात आली आहे. वन्यप्राण्यांच्या मुक्त संचारात कोणताही मानवी हस्तक्षेप होऊ नये आणि हा कार्यक्रम विनाअडथळा पार पडावा, यासाठी १ आणि २ मे रोजी कोअर, बफर व नियमित पर्यटनक्षेत्र पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या प्रगणनेदरम्यान जंगलातील अग्निप्रतिबंधक कामे आणि शिकार प्रतिबंधक गस्तीवर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही, याची विशेष दक्षता वनविभागाकडून घेतली जात आहे.

या उपक्रमात सहभागी होणाऱ्या निसर्गप्रेमींना सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाकडे हमीपत्र लिहून देणे अनिवार्य करण्यात आले आहे. तसेच जंगलात घडणाऱ्या कोणत्याही अनपेक्षित घटनेला शासन किंवा वनविभाग जबाबदार राहणार नाही, याची स्पष्ट कल्पना सहभागींना देण्यात येणार आहे. निसर्गाच्या सानिध्यात वन्यजीवांचे जवळून निरीक्षण करण्याची ही संधी असून, वन्यजीव संवर्धनाच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

Total Visitor Counter

3485942
Share This Article