खेड: भारतीय जनता पार्टी रत्नागिरी उत्तर जिल्हा कार्यकारणीची महत्वपूर्ण बैठक विधान परिषद आमदार प्रमोद जठार आणि जिल्हाध्यक्ष सतीश मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत खेड येथील पाटणे रेस्टॉरंटमध्ये उत्साहात पार पडली. या बैठकीत प्रामुख्याने “मोदी सरकारची १२ वर्षे – विश्वास, विकास व जनकल्याण” या अभियानांतर्गत रत्नागिरी उत्तर जिल्ह्यातील प्रत्येक मंडलनिहाय विविध कार्यक्रमांचे सविस्तर नियोजन करण्यात आले. आगामी काळात पक्षाच्या वतीने राबवल्या जाणाऱ्या विविध सामाजिक आणि संघटनात्मक उपक्रमांवर या वेळी अभ्यासपूर्ण चर्चा करण्यात आली.
या नियोजनानुसार ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त “एक झाड आईच्या नावाने” या अभियानांतर्गत जिल्हाभरात व्यापक वृक्षारोपण कार्यक्रम राबविला जाणार आहे. तसेच ६ जून रोजी शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून तालुक्यातील गड-किल्ले व शिवस्मारक परिसरात स्वच्छता अभियान राबवून छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करण्यात येणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. यासोबतच विशेष जनसंपर्क अभियान, मोदी सरकारच्या उपलब्धींचे प्रदर्शन, विविध स्पर्धांचे आयोजन, २१ जून रोजी जागतिक योग दिन, २५ जून रोजी आणीबाणीच्या ५१ वर्षांच्या पार्श्वभूमीवर विशेष कार्यक्रम तसेच २५ ते ३० जून दरम्यान जनकल्याण शिबिरांचे आयोजन यावरही सविस्तर चर्चा करून रुपरेषा निश्चित करण्यात आली.
बैठकीच्या उत्तरार्धात एसआयआर अंतर्गत मतदार यादी विशेष सखोल पुनरावलोकन, ‘मन की बात’ कार्यक्रम आणि पक्षाच्या विविध संघटनात्मक विषयांवर सखोल विचारविनिमय करण्यात आला. या वेळी आमदार प्रमोद जठार यांनी उपस्थितांशी संवाद साधत संघटन बळकटीसाठी आणि शासकीय योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पदाधिकाऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. या प्रसंगी भाजप नेते वैभव खेडेकर, ज्येष्ठ नेते राजूभाई रेडीज, जिल्हा महामंत्री निलेश सुर्वे, वसंत ताम्हणकर, अक्षय फाटक यांच्यासह जिल्हा उपाध्यक्ष, जिल्हा चिटणीस, कोषाध्यक्ष, विविध मोर्चा, आघाडी व प्रकोष्ठचे जिल्हा पदाधिकारी, जिल्हा निमंत्रित सदस्य, मंडल अध्यक्ष आणि मंडल सरचिटणीस मोठ्या संख्येने उपस्थित होते.






