दापोली: लग्नाच्या हळदी समारंभात पालगड येथील वृद्धाचा हृदयद्रावक अंत; अचानक चक्कर येऊन पडल्याने मृत्यू

saurabhsalvi26@gmail.com
2 Min Read

दापोली: तालुक्यातील पालगड गुजरवाडी येथील एका ६५ वर्षीय वृद्धाचा लग्नाच्या हळदी समारंभात सहभागी झाले असताना अचानक मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आनंदाच्या वातावरणात अचानक घडलेल्या या घटनेमुळे पालगड परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात असून, याप्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अनंत सिताराम पांचाळ (वय ६५, रा. पालगड गुजरवाडी) हे २५ एप्रिल रोजी रात्री पालगड सुतारवाडी येथे कल्पेश दीपक देवघरकर यांच्या लग्नाच्या हळदीच्या कार्यक्रमासाठी गेले होते. रात्री पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास हळदीचा कार्यक्रम रंगात आलेला असताना, पांचाळ यांना अचानक चक्कर आली आणि ते जमिनीवर कोसळून बेशुद्ध झाले. हा प्रकार लक्षात येताच उपस्थित नातेवाईकांनी आणि ग्रामस्थांनी त्यांना तातडीने पालगड येथील डॉ. किशोर फडके यांच्याकडे उपचारासाठी नेले. मात्र, त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे पाहून डॉक्टरांनी प्राथमिक तपासणीनंतर त्यांना तात्काळ पुढील उपचारासाठी दापोली उपजिल्हा रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला.

नातेवाईकांनी त्यांना तातडीने दापोली येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले, परंतु तेथील डॉक्टरांनी तपासणी अंती अनंत पांचाळ यांना दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच दापोली पोलिसांनी रुग्णालयात धाव घेऊन पंचनामा केला. २६ एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास याप्रकरणी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. लग्नाच्या उत्साही वातावरणात ज्येष्ठ व्यक्तीचा अशा प्रकारे अचानक मृत्यू झाल्याने पांचाळ कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *