दापोलीत डोंबिवलीतील तरुणाची गळफास लावून आत्महत्या

saurabhsalvi26@gmail.com
2 Min Read

दापोली: पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या दापोलीत एका २३ वर्षीय तरुणाने हॉटेलच्या खोलीत गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. श्रवण निनाद ठाकुरदेसाई (रा. डोंबिवली ईस्ट, ५०१ पित्रे बिल्डिंग) असे मृत तरुणाचे नाव असून, या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ठाकूरदेसाई कुटुंब दापोलीत आले असताना २६ एप्रिल रोजी सायंकाळी ५:१० वाजेच्या सुमारास ही घटना घडली. श्रवणची आई आरोही ठाकूरदेसाई या त्याला चहा पिण्यासाठी बोलवायला गेल्या होत्या. त्यावेळी श्रवणने बाथरूमच्या दरवाजाच्या हँडलला टॉवेलने गळफास लावून घेतल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी आरडाओरडा केल्यानंतर कुटुंबातील इतर सदस्य व नातेवाईक तातडीने तिथे पोहोचले. त्यांनी श्रवणच्या गळ्यातील टॉवेल काढून त्याला बेशुद्ध अवस्थेत खाली उतरवले. यानंतर हॉटेलच्या रिसेप्शनला कळवून तातडीने रुग्णवाहिका बोलावण्यात आली.

रुग्णवाहिकेतून श्रवणला तातडीने दापोली उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, सायंकाळी ६:३० वाजेच्या सुमारास तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच दापोली पोलिसांनी रुग्णालयात धाव घेऊन पंचनामा केला. रात्री ९:५० च्या सुमारास या प्रकरणी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यू क्रमांक ४१/२०२६ नुसार नोंद करण्यात आली आहे. एका तरुण मुलाने पर्यटनाच्या ठिकाणी असे टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *