GRAMIN SEARCH BANNER

मंडणगड तालुक्यातील कळकवणे येथे ८७ वर्षीय वृद्धाची गळफास घेत आत्महत्या

Gramin Varta
41 Views

मंडणगड : तालुक्यातील कळकवणे गावातील एका ८७ वर्षीय वृद्धाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी बाणकोट पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रावजी अर्जुन पवार (वय ८७, रा. कळकवणे, ता. मंडणगड) हे ३ जून २०२६ रोजी दुपारच्या सुमारास जनावरांच्या गोठ्यात काम करण्यासाठी गेले होते. मात्र बराच वेळ उलटूनही ते घरी परतले नसल्याने त्यांचे पुत्र संजय रावजी पवार यांनी त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली.

संजय पवार यांनी प्रथम गोठ्यात जाऊन पाहणी केली. मात्र तेथे रावजी पवार आढळून न आल्याने त्यांनी नातेवाईक, गावकरी तसेच परिसरात शोधमोहीम सुरू केली. शोधादरम्यान सोनू टेंबीचा टेप या ठिकाणी भोंडग्याच्या झाडाला काळ्या रंगाच्या दोरीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत रावजी पवार आढळून आले.

घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी तत्काळ धाव घेतली. त्यानंतर गावातील नागरिकांच्या मदतीने गळफासाची दोरी कोयत्याने कापून त्यांना खाली उतरविण्यात आले आणि खाजगी वाहनातून उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय, मंडणगड येथे नेण्यात आले. मात्र तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले.

या घटनेची नोंद बाणकोट पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू रजिस्टर क्रमांक ०२/२०२६ अन्वये भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १९४ अंतर्गत करण्यात आली असून मृत्यूमागील कारणांचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Total Visitor Counter

3471858
Share This Article