विकासकामांच्या नावाखाली होणारी लूट खपवून घेणार नाही : विकास गुरव
संगमेश्वर : कनकाडी गोताडवाडी येथील तळी बांधकामाच्या कामात मोठ्या प्रमाणावर अनियमितता आणि गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत युवा राजकारणी व सामाजिक कार्यकर्ते विकास बारकू गुरव यांनी ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची प्रशासनाने चौकशी केल्यानंतर संबंधित कामामध्ये त्रुटी व अनियमितता आढळून आल्याची माहिती समोर आली असून, त्यामुळे स्थानिक पातळीवर खळबळ उडाली आहे.
विकास गुरव यांनी केलेल्या तक्रारीनंतर संबंधित प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. अखेर प्रशासनाला या प्रकरणाची दखल घ्यावी लागली. चौकशीदरम्यान तळीच्या कामातील अनेक बाबींवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्याचे सांगितले जात असून, सार्वजनिक निधीचा वापर नेमका कसा झाला याबाबत ग्रामस्थांमध्येही तीव्र चर्चा सुरू झाली आहे.1 लाख 65 हजार 217 रुपयांची अनियमित कामे केल्याचे उघड झाले आहे. त्यातील 59 हजार 783 वसुलीसाठी ठेवण्यात आले आहेत. या प्रकरणाची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे.
या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना विकास गुरव यांनी, “जनतेच्या पैशांचा अपव्यय करणाऱ्यांना हा मोठा धक्का आहे. हा केवळ एका व्यक्तीचा नव्हे तर भ्रष्टाचाराविरोधात उभ्या राहिलेल्या प्रत्येक जागरूक नागरिकाचा विजय आहे. विकासकामांच्या नावाखाली होणारी लूट खपवून घेतली जाणार नाही,” असा इशारा दिला.
दरम्यान, चौकशीनंतर संबंधित दोषींवर कोणती कारवाई होणार, तसेच कामातील अनियमिततेमुळे शासनाच्या निधीचे किती नुकसान झाले याकडे आता ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. कनकाडी गोताडवाडी येथील या प्रकरणामुळे ग्रामीण भागातील विकासकामांच्या दर्जा आणि पारदर्शकतेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
कनकाडी गोताडवाडीतील तळी बांधकामाबाबत भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप; चौकशीनंतर अनियमितता केल्याचे उघड, कारवाईकडे लक्ष
Leave a Comment

