रत्नागिरी : दापोली कोकण कृषी विद्यापिठाने संशोधन केलेली रत्नागिरी-८ भाताचे वाण लोकप्रिय झाले आहे. आता शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरलेले असे कोकण सुवास हे भाताचे नवीन सुवासिक वाण विकसित केले आहे. त्यामुळे कोकण सुवास हे वाण भविष्यात अनेकांच्या जिभेची गोडी वाढवेल, असा दावा विद्यापिठाने केला आहे.
दापोली कोकण कृषी विद्यापीठांतर्गत शिरगाव येथील कृषी संशोधन केंद्रात २०१५ मध्ये सुपर – बासमती या भातबियाण्यावर गॅमा किरणांची प्रक्रिया करून कोकण सुवास ही नवीन सुवासिक जात विकसित केली आहे. तर विकसित केलेल्या या भातजातीला महाराष्ट्रातील चारही कृषी विद्यापीठांच्या ५२ व्या संयुक्त कृषी समितीने अकोला येथे झालेल्या बैठकीत मान्यता दिली आहे. त्यामुळे कोकण कृषी विद्यापीठाने १० वर्षे केलेल्या यशस्वी संशोधनाला यश मिळाले आहे. पारंपरिक भातबियाण्यातून मिळणाऱ्या उत्पादनातून शेतकऱ्यांची वर्षभराची धान्याची गरज भागत नाही. त्यामुळे कोकणातील शेतकरी गेली काही वर्षे चांगल्या प्रतीच्या तांदळाचे उत्पादन घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यात शेतकऱ्यांकडून बासमती भातपिकाच्या लागवडीसाठी भातबियाण्याची संशोधन केंद्रात विचारणा होते.
कोकणात खरीप हंगामात भात फुलोऱ्याला येते तेव्हा तापमानात वाढ झालेली असते. त्यामुळे सुवासिक भाताला कोकणात अपेक्षित वास
येत नाही. भाताचा वास हा मुख्यत्वे जमिनीचा प्रकार व तापमान या दोन मुख्य घटकांवर अवलंबून असतो. या सर्व बाबींचा विचार करून कोकण कृषी विद्यापिठाने हे वाण विकसित केले आहे. हे वाण शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरले आहे.
११५ ते १२० दिवसांचा कालावधी
कोकण सुवास ही जात हळवी असून, त्याचा कालावधी ११५ ते १२० दिवसांचा आहे. याचा तांदूळ लांबट बासमतीसारखा आहे. या वाणाचे उत्पन्न सरासरी ४५ ते ५० क्विंटल प्रतिहेक्टर एवढे येते. यावर्षी या जातीच्या दोनशे किलो बियाण्याची शिरगाव कृषी संशोधन केंद्रात विक्री केली आहे.