रत्नागिरी: रासायनिक खतांवरील अवलंबित्व कमी करून जमिनीचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी युरियाला (नत्र) पर्यायी खतांचा वापर करणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असे आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक शिवकुमार सदाफुले यांनी केले आहे. भात पिकासाठी शिफारस केलेल्या एकात्मिक खत व्यवस्थापनाचा अवलंब करून शेतकरी बांधव आपले उत्पादन वाढवू शकतात. खत मात्रा, त्याचा योग्य वापर आदीसाठी शेतकऱ्यांनी आपल्या परिसरातील सहाय्यक कृषी अधिकारी, उप कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी कार्यालयांशी संपर्क साधावा, असेही त्यांनी नमूद केले.
भात पिकासाठी प्रति हेक्टरी १०० किलोग्रॅम नत्र (N), ५० किलोग्रॅम स्फुरद (P) आणि ५० किलोग्रॅम पालाश (K) देण्याची शिफारस आहे. पहिला हप्ता चिखलणीच्या वेळी हेक्टरी ४० किलो नत्र, ५० किलो स्फुरद आणि ५० किलो पालाश, दुसरा हप्ता फुटवे फुटण्याच्या वेळी हेक्टरी ४० किलो नत्र आणि तिसरा हप्ता पिक फुलोऱ्यात असताना हेक्टरी २० किलो नत्र या शिफारशीनुसार वापर करावा.
रासायनिक खतांसाठी गिरीपुष्पाचा वापर हा एक चांगला पर्याय आहे. चिखलणी करताना हेक्टरी १० टन गिरीपुष्पाचा पाला जमिनीत गाडल्यास नत्राची गरज पूर्ण होण्यास मदत होईल. जर चिखलणीच्या वेळी हेक्टरी ५ टन गिरीपुष्पाचा पाला वापरला, तर शिफारस केलेल्या नत्राच्या (युरिया) मात्रेमध्ये ५०% कपात करावी, असे सदाफुले यांनी सांगितले.
जैविक खतांचा वापरही तितकाच महत्त्वाचा आहे. अॅझोटोबॅक्टर या जैविक खताची रोप प्रक्रिया केल्याने फायदा होतो. भात रोपे लावण्यापूर्वी ५०० मिली द्रव अॅझोटोबॅक्टर १५ ते २० लिटर पाण्यात मिसळावे. या द्रावणात २१ ते ३० दिवसांची निरोगी रोपे २० ते ३० मिनिटे भिजवून ठेवावीत. द्रावणात भिजवून ठेवल्यानंतर एक तासाने या रोपांची लागवड करावी. अॅझोटोबॅक्टर हे नत्र स्थिरीकरणाचे (Nitrogen Fixation) काम करते. यामुळे सुमारे २० ते २५ टक्के खताची बचत होते आणि जमिनीचे आरोग्य सुधारण्यास मदत होते, अशी माहिती कृषी अधीक्षकांनी दिली.
भात पिकाकरिता प्रति गुंठा खतांची वापर करण्याची मात्रा खालीलप्रमाणे आहे: चिखलणीच्या किंवा लावणीच्या वेळी ३ किलो NPK (१५:१५:१५) किंवा २ किलो NPK (१०:२६:२६) अधिक ०.५ किलो युरिया वापरावे. लावणीनंतर ३० दिवसांनी ०.५ किलो युरिया आणि लावणीनंतर ६० दिवसांनी ०.५ किलो युरिया वापरण्याची शिफारस आहे.
फवारणीसाठी NPK (१९:१९:१९) हे पाण्यात विरघळणारे खत विविध तीन टप्प्यामध्ये वापरण्याची सूचना करण्यात आली आहे. पहिली फवारणी पिकाच्या फुटवाच्या वेळेस, दुसरी फवारणी पिक फुलोऱ्यावर आल्यावर आणि तिसरी फवारणी भात पिकाच्या दाणे भरण्याच्या वेळेस करावी. प्रत्येक फवारणीच्या वेळेस प्रति १० लिटर पाण्यात ५० ग्रॅम या प्रमाणात हे खत वापरावे.
वरील उपाययोजनांचा अवलंब केल्यास शेतकऱ्यांचा रासायनिक खतांवरील खर्च कमी होऊन जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यास मदत होईल. अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी आपल्या परिसरातील सहाय्यक कृषी अधिकारी, उप कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी कार्यालयांशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांनी केले आहे.