सोनवी पुलावर महिना पूर्ण होण्याआधीच पहिला भीषण अपघात; घाईगडबडीत सुरू केलेल्या एकमार्गिकेमुळे वाहनचालकांचे प्राण धोक्यात

Gramin Varta
484 Views

संगमेश्वर/ एजाज पटेल: प्रचंड घाईगडबडीत वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेल्या नवीन सोनवी पुलावर महिना पूर्ण होण्याच्या आतच मंगळवारी सकाळी पहिला भीषण अपघात घडला. मुंबई आणि गोवा या दोन्ही दिशांनी येणारी अवजड वाहने (आयशर ट्रक आणि कंटेनर) पुलावर समोरासमोर धडकल्याने मोठा अपघात झाला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी, संबंधित ठेकेदार आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या बेजबाबदार नियोजनामुळे वाहनचालकांच्या जिवाशी खेळ सुरू असल्याचा संताप व्यक्त होत आहे.

सकाळी पुलाच्या दिशेने झालेल्या मोठ्या आवाजामुळे स्थानिक नागरिक आणि प्रवाशांनी घटनास्थळी धाव घेतली असता, दोन अवजड वाहने समोरासमोर धडकल्याचे दृश्य दिसून आले. मिळालेल्या माहितीनुसार, सोनवी पुलाच्या गोवा दिशेकडील मार्गिकेचे काम घाईत पूर्ण करून ती वाहतुकीसाठी खुली करण्यात आली आहे, तर मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गाचे काम अद्याप अपूर्ण आहे. पूल पूर्ण नसताना आणि कोणतीही पुरेशी सुरक्षा यंत्रणा, दिशादर्शक फलक किंवा गतिरोधक नसताना एकाच मार्गिकेतून दोन्ही बाजूंनी वाहने सोडणे जीवघेणे ठरत आहे. विशेषतः पुलाचे तीव्र वळण असल्याने समोरून येणाऱ्या वाहनांचा अंदाज चालकांना येत नाही, ज्यामुळे हा अपघात घडला.

अपघातामुळे पुलावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून मोठी वाहतूक कोंडी झाली होती. संगमेश्वर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला आणि वाहने बाजूला सारत वाहतूक पूर्ववत केली. या दुर्घटनेत तीन जण किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर स्थानिक ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. दरम्यान, मंगळवारी संध्याकाळपर्यंत याप्रकरणी पोलीस ठाण्यात अधिकृत गुन्हा दाखल झालेला नव्हता. नवीन पुलाच्या उद्घाटनानंतर महिन्याभरातच अपघातांचे सत्र सुरू झाल्याने, प्रशासनाने तातडीने मुंबई लेनचे काम पूर्ण करावे किंवा या मार्गिकेवर तातडीने सुरक्षा व्यवस्था तैनात करावी, अशी जोरदार मागणी आता स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांकडून केली जात आहे.

- Advertisement -
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *