मुंबईत पावसाचे दमदार आगमन; सखल भागात पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत

Gramin Varta
49 Views

मुंबई : मुंबईत मंगळवारी रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने शहराला अक्षरश: झोडपून काढले असून, पहिल्याच पावसात मुंबईकरांची चांगलीच दाणादाण उडाली आहे. पावसामुळे शहराच्या अनेक सखल भागात पाणी साचले असून, त्याचा फटका रस्ते आणि रेल्वे वाहतुकीला बसला आहे. कुर्ला, माटुंगा, दादर, परळ, अंधेरी आणि सांताक्रूझ यांसह विविध उपनगरातील सखल भागात गुडघाभर पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. कुर्ला डेपो आणि गांधी मार्केट परिसरात पाणी साचल्याने प्रवाशांना कसरत करत मार्ग काढावा लागला, तर अनेक ठिकाणी सांडपाणी रस्त्यावर आल्याने नागरिकांचे हाल झाले.

पावसाच्या या जोरधार माऱ्यात दादर रेल्वे स्थानकाच्या पूर्व भागात उभ्या असलेल्या एका गाडीवर झाड कोसळल्याची घटना घडली, तर विक्रोळी परिसरात इमारतीची संरक्षक भिंत कोसळली. सुदैवाने या दोन्ही घटनांत कोणतीही जीवितहानी झाली नाही. पावसाचा सर्वाधिक फटका बुधवारी सकाळी कार्यालयासाठी निघालेल्या नोकरदार वर्गाला आणि शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना बसला. मध्य रेल्वेच्या रुळांवर पाणी साचल्यामुळे कुर्ला ते माटुंगा दरम्यान लोकल सेवा १० ते १५ मिनिटे विलंबाने धावत होती. यामुळे कुर्ला, विद्याविहार, घाटकोपर आणि सायन रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी उसळली होती. बस आणि रिक्षांमध्येही प्रवाशांचा मोठा लोंढा दिसून आला. याशिवाय, ग्रांट रोड परिसरात वीज पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांच्या अडचणीत भर पडली. पावसाचा जोर कायम असल्याने जनजीवन काही काळ पूर्णपणे विस्कळीत झाले होते.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *